राजकारण

किरीट सोमय्या ईडी कार्यालयात; राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंबई : जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी-विक्री व्यवहाराविरोधात पुरावे देण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज ईडी कार्यालयात पोहोचले. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याबाबतचे पुरावे आपण ईडी आणि आयकर विभागाला देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान, ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीने आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही कार्यकर्ते सोमय्या यांना विरोध करण्यासाठी या कार्यालयात जमले आणि घोषणाबाजी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याबाबतचे कागदपत्र ईडीकडे सादर केले आहेत. अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्यावर बेनामी पद्धतीने ताबा मिळवला असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी नाव का दिले असा प्रश्न सोमय्यांनी केला आहे. ईडीचे अधिकारी दिलेल्या कागदपत्रांवर चौकशी करत असल्याची माहिती सोमय्यांनी दिली आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांना कागदपत्र सादर केल्यानंतर सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना सोमय्या म्हणाले की, अजित पवार यांनी जे बेनामी पद्धतीने जरंडेश्वरवर कब्जा घेतला. गुरु कमोडीटी हा कोणी व्यक्ती आहे का?, अजित पवारांनी स्वतःच्या कंपनीला गुरु कमोडीटी का नाव दिले. एका बाजूला गुरु कमोडीटीमध्ये लेयर उभे केले. दुसऱ्या बाजूला जरंडेश्वर साखर कारखान्यात लेयर उभे केले. फक्त एवढेच नाही तर कारखाना चालवण्यासाठी त्यांनी जे सध्या २ आयकर विभागाच्या धाडी पडल्या त्यात जे दोन मोठे बिल्डर आहेत. जे शरद पवार यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे माया सापडली त्यांनी अजित पवारांना १०० कोटी रुपये २००८ साली दिले. व्याज नाही काही नाही फक्त असेच एक रुपयाचा व्याज नाही दिले. आजही ते पैसे तसेच अजित पवारांकडे पडून आहेत. हा सगळा घोटाळा हायकोर्टात रिपोर्टमध्ये देण्याचा आग्रह केला असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ संस्थापक जे २७ हजार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आले आहेत. कारखाना चालू आहे चालूच राहणार आहे. कामगारांना काम चालू राहणार आहे. शेतकरी सुरक्षित आहेत पंरतु जे लुटारु स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, बँकेचे इनचार्ज, स्वतःच प्रकरण हाताळताना कारखाना स्वतःकडे घेतला. त्याच बरोबर अजित पवारांनी १ हजार कोटी रुपयांहून अधिकची संपत्ती बेनामी पद्धतीने गोळा केली. हे मुद्दे ईडीकडे मांडले असून मला विश्वास आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळेल असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांनी आयकर विभागाच्या पहिल्या दिवशी डोळ्यात पाणी आणून म्हटले की, माझ्या बहिणींच्या घरी छापेमारी केली. यांच्या बहिणीच या कारखान्याच्या मालक आहेत. अजित पवारांनी संपत्ती बहिणीच्या नावाने उभी केली, बहिणीला फसवले की बहिणीच यामध्ये कारखान्याच्या मालक आहेत असा प्रश्न सोमय्या यांनी केला आहे.

किरीट सोमय्या हे ईडी कार्यालयात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात २० ते २५ कार्याकर्त्यांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button