राजकारण

राणे कुटुंबीयांवरच गंभीर गुन्हे दाखल; नितेश राणेंवर बदनामीचा दावा दाखल करणार : वरुण सरदेसाई

मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलेल बेछूट आरोपांवर बदनामीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी संध्याकाळी दिली. राणे कुटुंबीयांची सुरूवातीची गॅंग असो, असंख्य गंभीर गुन्हे या कुटूंबीयांवर आहेत. त्यामध्ये खुनापासून ते खंडणी, धमकावणे आणि किडनॅप करणे अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणे कुटूंबीयांचा हा इतिहास विधानसभेत मांडला आहे, तो रेकॉर्डवर आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जे बेछूट आरोप केले. हे आरोप तथ्यहीन आहेत. आमदार नितेश राणे यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार आहे. त्यामुळे राणे कुटूंबीयाने आरोप सिद्ध करावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला समोर जावे असे आव्हान सरदेसाई यांनी दिले आहे.

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडीच्या प्रकरणात थेट वरुण सरदेसाईंना ओढल्यानं मोठं राजकारण सुरू झालंय. त्यालाच आता युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. राणेंवर मर्डर, अपहरणाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, खुद्द फडणवीसांनीच हे मांडलय, आज ते भाजपमध्ये गेलेत, तर महाविकास आघाडीतील विविध नेत्यांवर आरोप करत आहेत. गेले काही दिवस ते माझ्यावर वैयक्तिकरीत्या आरोप करत आहेत. राणे कुटुंबीयांना जनता अजितबात गांभीर्यानं घेत नाही. त्यांना भीक घालत नाही, असंही वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.

त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावेत अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला तयार राहावे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर अतिशय घाणेरडे आरोप केलेत. ते सगळे आरोप तथ्यहीन असून, त्या आरोपांमुळे मी आमदार नितेश राणे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकत आहे, असंही वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केलंय. आपण सगळे मला युवासेनेचा सचिव म्हणून ओळखता. त्याच्या आधीची मी माझी पार्श्वभूमी सांगतो. दहावीत मला 91 टक्के गुण मिळाले. त्यानंतर बारावीत मला डिस्टिन्क्शन मिळालं. त्यानंतर मुंबई विद्यापीठात मी सिव्हिल इंजिनीअरची पदवी मिळवली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या अशा जगातील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात मी मास्टर्स इन सिव्हिल इंजिनीअरची पदवी मिळवली. ही पदवी अगदी एका वर्षात मिळवली. मी ते करून परत आलो. माझ्या वडिलांचा व्यवसाय आहे. मी युवा सेनेत काम करतो. माझे वडील मॅकेनिल इंजिनिअर आहेत. त्याचबरोबर माजे आजोबाही इंजिनिअर आहे. मी सुसंस्कृत कुटुंबात आहे. मला राजकारणाची आवड आहे. पण आज जे आरोप केले तसे कामं माझ्याकडून घडणारही नाहीत, असंही वरुण सरदेसाई म्हणाले आहेत.

राणे यांचे संपूर्ण कुटूंब वाईटावर उठलंय म्हणूनच मला सुरक्षा दिली आहे. गेल्या सहा महिन्यात राणे कुटूंबाकडून बेछूटपणे आरोप करण्यात आले आहेत. राणे कुटूंबीयांकडून धोका असल्यानेच मला पुरवण्यात आलेली सुरक्षा ही त्याचाच भाग असल्याचे वरूण सरदेसाई यांनी स्पष्ट केले. मला वाय प्लस सुरक्षा नाही, एक्स कॅटेगरीची सुरक्षा असल्याचाही खुलासा त्यांनी यावेळी केला.

वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. ते पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ लागतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भगिनीचे ते पुत्र आहेत. वरुण यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदासह शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. वरुण सरदेसाई हे पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवाली अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता. 2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button