इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून काँग्रेस मंत्र्याने अजितदादांना डिवचले !

इंदापूर: भविष्यात इंदापूर विधानसभा मतदारसंघ कायम स्वरूपी राष्ट्रवादीकडे राहील अशी परिस्थिती आज असताना आघाडी सरकारमधील मंत्र्यांने इंदापूरची जागा आम्ही लढविणार, ती सोडणार नाही, असे वक्तव्य करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट डिवचण्याचा प्रकार झाला आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे. इंदापूरसहीत संपूर्ण राज्यात काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असं सांगत वडेट्टीवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिलं आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काही महिन्यांपूर्वी इंदापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी इंदापूर तालुक्याचा पुढील आमदार काँग्रेसचाच असेल असं म्हणत नव्या वादाला तोंड फोडले होते. पटोले यांचं हे विधान ताजं असतानाच इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेस शंभर टक्के लढवणारच. ही जागा कुणालाही सोडण्यात येणार नाही, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील विधानसभेच्या जागेचा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची की काँग्रेसची यावर अनेक वादंग निर्माण झाले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला होता. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी निवडणुकीपूर्वीच तुटते की काय? असं चित्रं तेव्हा निर्माण झालं होतं. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यांच्या विरोधात तत्कालीन कॉंग्रेसचे नेते आणि आता भाजपात असणारे भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे भरणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसमध्ये २० वर्षे राहून अनेक मंत्री पद भूषवली होती. ते काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसच्या अनेक मोठ्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असायचा. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाचाला कंटाळून काँग्रेस सोडत आहे, असा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील भाजप उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे होते. या अटीतटीच्या लढतीत भरणे यांचा अवघ्या ३३१० मतानी विजय झाला होता. पुन्हा एकदा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता.




