रात्रीची वेळ आहे, म्हणजे साधारणपणे एखादया बारमध्ये बसून दोन पेग रिचवल्यानंतर अगदी जो बायडेनलासुद्धा खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्लॅन बनवण्याची वेळ ! अशावेळी देवानाना नागपूरकर ‘सागर’ बंगल्याच्या हिरवळीवर बसून शांतपणे चहाचा एक एक घोट रिचवत (दुसरं काहीही रिचवायची कितीही इच्छा असली तरी संस्कार आडवे येतात हो ! नाही हो जमत प्रत्येकाला !) कोणाची तरी वाट पाहत आहेत. पूर्वी ते असल्या सल्लामसलतींसाठी दिवाणखान्यातच बसत असत ,पण पहाटेच्या शपथविधीची बातमी दिवानखान्यातूनच लिक झाल्याची शंका आल्यामुळे सौंनी दिलेला, ‘भिंतीलासुद्धा कान असतात,’ हा सल्ला त्यांना मोलाचा वाटला आणि त्यांनी दिवाणखानासोडून हिरवळीवर बसायला सुरुवात केली. अर्थात आता जागा बदलून बसण्याची त्यांना सवयच झालेली आहे.
पूर्वी नाही का उजवीकडच्या बाकांवर बसायचे, आता डावीकडच्या बाकांवर बसतातच ना? माणसाच्या आयुष्यात कधीही काहीही घडू शकतं हे त्यांना रामायण वाचल्यापासून पटलं आहे. रामाला नाही का राज्याभिषेकाची तयारी पूर्ण झालेली असतांना वनवासात जावं लागलं होतं ? असंच अचानक आपल्याला संन्यास घ्यावा लागला तर , या विचारातून त्यांनी डझनभर ब्रॅण्डेड भगव्या कफनीसुद्धा मागवून घेतल्या होत्या. ( देवानाना काहीही वापरणार ते ब्रँडेडच ! असं भिकारड्यासारखं टेलरकडून काहीही शिवून घेण्याचा दळभद्री विचारही त्यांच्या डोक्यात येत नाही) नंतर एक दोन लोकांनी ( जरी ते दुर्लक्षित करण्याच्या लायकीचे असले तरी) त्यांनी संन्यास घेऊ नये अशी विनंती केल्यामुळे ( आणि त्यांच्या विनंतीला मान देणे आपल्या फायद्याचे असल्याचे सौंंनी लक्षात आणून दिल्यामुळे) या सर्व कफनी पुढेमागे तुम्हाला कामास येतील का, असे आपले जुने मित्र उधोजीराजेंना एकदा विचारावं, ते नाही म्हटले तरी त्या सर्व त्यांना भेट देण्याचा योग येतो का याची काही दिवस वाट पाहावी आणि नंतर त्या अयोद्धेतल्या श्रीराम मंदिरातील साधूंना दान करून टाकाव्यात असं त्यांनी ठरवूूून टाकलंं.
थोड्याच वेळात चं. दा. कोल्हापूरकर येऊन समोरच्या खुर्चीवर बसतात. त्यांच्या कपात किटलीने चहा ओततांना देवानानांचा हात पोळतो.
देवानाना – (ओरडत) साली , चहापेक्षा किटलीच जास्त गरम आहे !
चं. दा. – (मिश्कीलपणे) त्या ‘वाचाळ’ संपादकाबद्दल बोललात की काय ?
देवानाना – नाही हो, या किटलीने हात पोळला.
चं. दा.- (चहाचा कप उचलत) बोला नाना, कशासाठी बोलावलं ?
देवानाना – ( हळू आवाजात) दादा, आता करोना जवळजवळ संपला आहे, करायचा का मग ‘ करेक्ट कार्यक्रम’ ?
चं. दा – (उत्सुकतेने) फसतंय का कोणी जाळ्यात ?
देवानाना – दादा , फसले की कोणी तरी , आधी जाळं तर टाकायला हवं ना ?
चं. दा. – टाका की मग ,पण मागच्या वेळेसारखा बेडूक नको यायला जाळ्यात .टुणकन उडी मारेल आणि जाईल परत पाण्यात.
देवानाना – काय करता दादा , मला वाटलं होतं देवमासा आला जाळ्यात, तो बेडूक निघाला. एकदा दुधाने पोळलो आहोत ना ; आता ताकसुद्धा फुंकून पिऊ.
चं. दा. – मग काय , फेका की जाळं. पण कोणता देवमासा फसेल जाळ्यात , काही अंदाज ?
देवानाना – (मिश्कीलपणे) दादा, म्हणतात ना, नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधू नये म्हणून ? देवमाशाचं तर काहीच शोधू नये. आपल्या जाळ्यात अडकला म्हणजे झालं. बारामती असो की बांद्रा, आपल्याला काय फरक पडतो ? कुठल्याही बाजारात गेलो तरी बाजारभाव चुकविल्याशिवाय काही पदरात पडत नाही.
चं. दा. – (मनातल्यामनात) पराभूत माणसालाच असं तत्वज्ञान सुचतं. ( उघडपणे) व्वा ! व्वा !! काय छान बोललात. तरी एकदा दिल्लीश्वरांना विचारून घ्या.
देवानाना ताबडतोब दिल्लीश्वरांना फोन लावतात.
देवानाना – (फोनवर) जय श्रीराम. प्रभो, जाळं फेकू का ?
दिल्लीश्वर – (मिश्कीलपणे) अरे, तमे जाळी के फेंकी रह्या छो ? तेनी कोई जरूर नथी. जुनू गीत याद छे ?
आँखों से जो उतरी है दिल में
तसवीर है एक अनजाने की
खुद ढूँढ रही है शम्मा जिसे
क्या बात है उस परवाने की
समझे?
————-