मुक्तपीठस्पोर्ट्स

देखणे ते चेहरे, जे प्रांजळाचे आरसे !

- अ‍ॅड. योगिनी बाबर (नाशिक)

देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥

देखणे ते चेहरे
जे प्रांजळाचे आरसे ।
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे ॥

कवी बा. भ. बोरकरांनी अत्यंत समर्पक अशा शब्दांत रचलेल्या या काव्यपंक्ती समाजातील अशा असंख्य देखण्या हातांना आणि प्रांजळ चेहऱ्यांना अगदी चपखल लागू पडतात. त्यातलाच एक प्रांजळ चेहरा आणि देखणे हात म्हणजे नाशिकचे सुप्रसिद्ध वकील अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे होय. ज्यांनी, शाळा महाविद्यालयापासूनच उपजत असणारे क्रिकेटचे वेड आपल्या आयुष्याचा, वकिली व्यवसायाचा अविभाज्य घटक बनवतानाच त्याला सामाजिक कृतज्ञतेची संवेदनशील जोड दिली आहे.

तसेही भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर बनण्यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या कमी नाही. क्रिकेटवरचे मुलांचे प्रेम आणि आपल्या मुलाला सचिनसारखाच बनवण्यात आयुष्य खर्ची घालणाऱ्या पालकांची इथे अजिबातच उणीव नाही. अशा या क्रिकेटमय जगतात स्वतःच्या क्रिकेटवेडाची जपणूक अनोख्या पद्धतीने करणारे अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे थोडे हटके व्यक्तिमत्वच म्हणावे लागेल.

सर्वसामान्यपणे वकिली व्यवसायात येणारा प्रत्येकजण दोन-चार वर्षात आर्थिकदृष्ट्या कसा सेटल होईल आणि एकदाचा सेटल झाला की, मी माझे कार्यालय, माझे अशील आणि माझा व्यवसाय या वर्तुळातच रमणे प्रत्येकालाच सुरक्षित वाटते. अ‍ॅड. जगदाळे नेमके याच मानसिकतेला अपवाद आहेत, असं खात्रीनं मानावं लागेल. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे हा जणू त्यांचा स्वभावधर्म. त्यातही स्वतःचे पॅशन जपायचे तर अधिकच आग्रही असणे क्रमप्राप्तच. महाविद्यालयात असताना खोलवर रुजलेले क्रिकेटप्रेम वकिलीत थोडे स्थिरावल्यावर त्यांना पुन्हा खूणावू लागले तर नवल नाही. अनेक वकील खेळांडूप्रमाणे तेही स्पर्धेत सहभागी होत होते, पण त्यात समाधान नव्हते. याच अस्वस्थतेतून आणि लहानपणापासून वडिलांकडून मिळालेल्या सामाजिक सहिष्णुतेतून समाजाप्रती आपले काही उत्तरदायीत्व आहे या निखळ भावनेतूनच स्व. रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन, कृष्णा क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि नाशिक डिस्ट्रिक्ट अ‍ॅडव्होकेटस क्रिकेट अ‍ॅण्ड स्पोर्टस असोसिएशन या संस्था आकाराला आल्या. या माध्यमातून आपल्या गावी दहीवाडी, ता. सिन्नर येथे २०१३ पासून वार्षिक जत्रेच्या निमित्ताने क्रिकेटचे फड आयोजित करण्यास अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी सुरुवात केली. नाशिक बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप वनारसे यांच्या उपस्थितीत अनेक नाशिककर वकिलांनीही आजवर हे क्रिकेटचे फड गाजवले आहेत. तर कृष्णा क्रिकेट अ‍ॅकॅडमीत आजमितीला दरदिवशी किमान १०० विद्यार्थी क्रिकेटचे शास्त्रोक्त धडे गिरवत आहेत.

वकिली व्यवसायात जीव ओतून काम करणाऱ्या अ‍ॅड. जगदाळेंना त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, बिनधास्तपणा आणि कायद्याच्या भाषेतील अचूक लिखाणासाठी जितकी दाद मिळते तितकीच किंबहुना त्याहूनही अधिक दाद त्यांच्या भेदक गोलंदाजीला मिळते हा अनुभव सर्वश्रुत आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना क्रिकेटचे मैदान गाजवताना पाहिले आहे ते माझ्या या मताशी निश्चितच सहमत असतील. जे झेपेल तेच करेन आणि जे करेन ते सर्वोत्तम असेल असाच काहीसा होरा ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या अ‍ॅड. जगदाळे यांनी २०१३ पासून वकिलांसाठी क्रिकेट स्पर्धेचे राज्यपातळीवर आयोजन केले आहे. यंदाही नाशिकच्या विविध १३ मैदानांवर राज्यातील सुमारे ८० वकील संघांचा सहभाग असणाऱ्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचेही यशस्वी आयोजन करुन अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी आपले क्रिकेटप्रेम कायम ठेवले आहे.

कोरोना संक्रमणाच्या भीतीने मागच्या वर्षी रद्द करण्यात आलेल्या या स्पर्धा यंदाही घेता येतील की नाही याची स्पर्धेच्या उद्घाटनाच्या क्षणापर्यंत धाकधूक होतीच, पण २६ डिसेंबर २०२१ पासून दिमाखात सुरु झालेल्या या स्पर्धेची सांगता २ जानेवारी २०२२ रोजी अत्यंत उत्साहात झाली. राज्यभरातील ८० संघांच्या माध्यमातून जवळपास दीड ते दोन हजार वकील खेळांडूनी आपला सहभाग नोंदवत अत्यंत दर्जेदार खेळाचे प्रदर्शन भरवले. ऐन कडाक्याच्या थंडीत खेळताना दुखापत झाली तरीही खेळांडूनी खेळण्याची जिद्द काही सोडली नाही. सर्व वयोगटातील क्रिकेटप्रेमींचा हा दांडगा उत्साह वाखाणण्याजोगाच होता. स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षिस वितरणानिमित्त मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. प्रकाश नाईक, न्या. संदीप शिंदे, न्यायाधीश दिलीप घुमरे, अ‍ॅड. संजीव कदम, अ‍ॅड. नितिन ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. नाशिक येथील ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. कमलाकर दिघे संकलित ‘दस स्पोक द ग्रेट जज’ या पुस्तकाचे प्रकाशनही स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्यानंतरचे पहिले न्यायाधीश स्व. एम. सी. छागला यांच्या आत्मचरित्रातील निवडक निवाड्यांचे संकलन या पुस्तकात करण्यात आले आहे.

आठ दिवस रंगलेल्या या स्पर्धेचे नियोजन दोन महिने आधीपासून अखंडपणे सुरु होते. अ‍ॅड. जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्तमरीत्या हे धनुष्यबाण पेलले आहे, अशी शाबासकीची थाप राज्यभरातून आलेल्या खेळाडू, मान्यवरांनी दिली यातच या स्पर्धेचे यश आहे. सानेगुरुजींनी कर्माबाबत एकेठिकाणी असे म्हटले आहे की, तुमच्यात जर कर्तबगारी असेल तर तुम्हाला देवपूजा करताना झाडावरच्या फुलांची गरज पडणार नाही, तर तुमच्या कर्मफुलांनीच तुमची देवपुजा सफल होईल. अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांचे हे क्रिकेटप्रेम फक्त खेळापुरते मर्यादित न राहता, जेव्हा राज्यभरातील वकील खेळांडूच्या व्यक्तिगत आयुष्याशी, सुख-दुःखाशी कनेक्ट होते तेव्हा तिथे कर्तबगारीला कर्माची जोड मिळते. म्हणूनच दोनशे चारशे किलोमीटर अंतरावरचा एखादा वकील, माझ्या एक मित्राचा अपघात झाला आहे तू मदत करशाील का, असा फोन करतो तेव्हा न्यायालयात असो वा आपल्या शेतावर राबत असणारा हा वकीलमित्र हातातील कामे बाजूला ठेवून अपघातस्थळी अर्ध्यातासात शंभर वकिलांची, मदतीची फौज उभी करु शकतो. अनेकदा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात न्यायालयीन कामकाजासाठी धावपळ करणे शक्य होत नाही असे दिसताच वकीलांकडून हक्काने राज्याच्या कानाकापेऱ्यातून फोन येतात, तेव्हा कोणताही मोबदला न घेता, ती कामे अडथळ्याविना कशी पूर्ण होतील याकडे कटाक्ष राखला जातो. फक्त कोर्टकामासाठीच नाही तर आपल्या लेकीबाळींच्या विवाहासाठीही वरपक्ष, वधूपक्षाची पडताळणी करण्यासाठीही अनेक पालक त्यांच्याकडे येताच आश्वस्त होतात. कोरोना काळात जीव गमावलेल्या वकील मित्रांच्या कुटुंबियांना तातडीने मदत पोहोचवली जाते. या काळात एकट्या राहणाऱ्या न्यायालयातील कनिष्ठ सहकाऱ्यापर्यंत अन्न धान्य पोहोचवले जाते. हे कमी म्हणून की काय समाजाचे आपण काही देणे लागतो या जाणिवेतूनच वकिलांसाठी वकीलांसाठी वेल्फेअर फंड का उभा राहू नये यासाठी आपल्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सक्रिय योगदान दिले जाते, आजारी वकील मित्रांपर्यंत कोणताही गाजावाजा न करता सातत्याने गरज लक्षात घेत सहकार्य केले जाते, कनिष्ठ सहकारी, नव्याने वकिली व्यवसायात येवू पाहणाऱ्यांना काय येते यापेक्षा त्यांची मेहनत घेण्याची, शिकण्याची तयारी, प्रामाणिकपणा जोखून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. असे एक ना अनेक अनुभव या माणसाच्या सानिध्यात आल्यावर येतात. ‘आहे रे’ गटापेक्षा ‘नाही रे’ गटामध्ये अधिक रमणाऱ्या अ‍ॅड. विवेकानंद जगदाळेंच्या असंख्य कर्मफुलांचे हार कोणता देव नाकारेल हाच प्रश्न पडावा. या सर्वात त्यांना त्यांची आई, अर्धांगिनी सौ. संगिता, मुली वेदांती, तुळजा आणि लेक कृष्णा या सर्वांचीच अनमोल साथ मिळते आहे.

सर्वसाधारणपणे डिसेंबर महिना म्हणजे सरत्या वर्षाला हुडहुडत्या थंडीत निरोप देण्याचा महिना असे मानले जाते. पण थोडेसे इतिहासात डोकावले तर लक्षात येते की, वर्षातले सहा सहा महिने स्वतःला कोंडून घेत कार्यमग्न असणाऱ्या संशोधकांना यश दाखवणारा हाच तर महिना आहे. कोणत्याही सेलिब्रेशनमध्ये अडकून न पडता पुन्हा नव्या जिद्दीने, नव्या उत्साहाने नव्या प्रयोगाकडे नेणारा हा महिनाही ‘इट इज व्हेरी इजी टू रिच ऑन द टॉप, बट इट इज व्हेरी डिफीकल्ट टू रिमेन ऑन द टॉप’ हाच मंत्र देताना दिसतो. म्हणूनच तर अनेक अडचणींवर मात करीत दरवर्षी डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणारी वकिलांची ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे एक न संपणारा प्रयोगच आहे. वकिलांसाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ही नव्या पिढीतील वकील खेळाडू बनवणारी कार्यशाळाच ठरावी.

समाजात अनेक चांगल्या गोष्टी जपण्याचं, मातीचा, नात्याचा ओलावा टिकवून ठेवण्याचं काम अनेक मंडळी, संस्था अविरतपणे करीत असतात. ‘हातांनी जे पेरावं तेच उगवून हाती पडतं ॥ श्रमणाऱ्या हातांनीच जीवनाला वैभव चढतं ॥’ हे तंतोतंत ज्यांना लागू पडते त्या अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांच्या कार्यकर्तृत्वाला यानिमित्ताने सलामच करायला हवा. आई-वडिलांनी दिलेल्या संस्काराचा, सामाजिक कार्याचा वसा घेत जन्मभूमी, कर्मभूमीवर नितांत प्रेम असणारा, मातीशी जोडलेली नाळ कधीच तुटणार नाही यासाठी प्रयत्नशील असणारा, माणसे जोडणारा हा ध्येयवेडा वकील त्याच्यातील सच्चेपणाने, दिलदारीने इतरांपेक्षा वेगळा ठरतो, हे मान्य करावंच लागतं !

— — —

महाराष्ट्राचे एकीकरण करणारा वकील

 

वकिलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे सातत्याने उत्तररीत्या आयोजन करणाऱ्या नाशिकच्या अ‍ॅड.विवेकानंद जगदाळे यांना खरे तर महाराष्ट्रातील वकिलांचे एकीकरण करणारा वकील असेच ओळखावे लागेल. स्व.रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन आणि नाशिक डिस्ट्रिक्ट अ‍ॅडव्होकेस क्रिकेट अ‍ॅण्ड स्पोर्टस असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्रालच नाही तर कर्नाटकच्या वकील संघांना नाशिक येथे क्रिकेट खेळण्याची संधी जगदाळेंच्या माध्यमातून मिळाली आहे. मी २००० पासून त्यांच्यासोबत आहे. स्वतःचे कौशल्य वापरुन सर्वांना एकत्रित ठेवण्याचे काम ते करतात. स्पर्धेबाबत महाराष्ट्रातील सुमारे २ ते ३ हजार वकील खेळांडूसोबत चर्चा झडतात, प्रत्येकाचा विचार होईल यावर ते भर देतात. जवळपास १५ वर्षांच्या आमच्या मैत्रीपुर्ण नात्यात त्यांना जवळून अनुभवता आले. वकील मंडळीवर असणारा कामाचा, व्यावसायिक स्पर्धेचा ताण लक्षात घेत वकिलांमध्ये तंदुरुस्ती, सुसंवाद वाढावा, राज्यभरतील वकिलांची या निमित्ताने ओळख होते असा सर्वंकष विचार करुन जगदाळेंनी सुरु केलेल्या या क्रिकेट स्पर्धा प्रत्येकासाठी आवश्यक बनल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने सहभागी झालेल्या वकिलांमध्ये वर्षानुवर्षाचे मैत्रीचे नातेसंबध तयार झाले आहेत. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरचे आयोजन तसे जिकीरीचे होते, मात्र अनेकांच्या सहकार्याने अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी ते करुन दाखवले, हे कौतुकास्पदच आहे.

– अ‍ॅड.राजू वाघ, मालेगाव

— — —

क्रिकेटवर प्रेम करणारा राजा माणूस

नाशिकमध्ये आम्ही तसे १९९९ पासून क्रिकेट स्पर्धेसाठी येत होतो. २०१३ मध्ये पहिल्यांदा नाशिकच्या अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे सरांसोबत क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालो. तेव्हापासून त्यांच्यासोबत आहोत. एक मित्र, एक वकील, क्रिकेटवर नितांत प्रेम करणारा राजा माणूस अशीच त्यांची ओळख द्यावी लागेल. राज्यातील वकिलांमध्ये व्यवसायाव्यतिरिक्त एकमेकांप्रती सांघिक भावना, मैत्रीचे नाते तयार करण्याचे काम जगदाळे सरांनी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमरीत्या केले आहे. सरांची ओळख होण्याआधी, त्यांचे काम, क्रिकेटवरची त्यांची निष्ठा माहीत होण्याआधी आम्ही स्वतःलाच क्रिकेटवेडे समजत होतो, पण हा तर बाप माणूस निघाला. फक्त वकिलांसाठी इतक्या मोठया संख्येने आठ दिवस नाशिकसारख्या शहरांत स्पर्धेचे आयोजन आणि नियोजन करणे हे नक्कीच अचंबित करणारे आहे. ज्या संघांची आर्थिक परीस्थिती नाही, जे दुर्गम भागात राहतात मात्र वकिलांमध्ये सचोटीने क्रिकेट खेळण्याची आस आहे, अशा वकील खेळांडूना खेळाच्या साहित्यापासून सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास जगदाळे सर तत्पर असतात. म्हणूनच वर्षभरात राज्यातील इतर कोणत्याही बारने स्पर्धेचे आयोजन करो वा ना करो, ही जबाबदारी सरांनी पेलावी अशी अपेक्षा राज्यातील सर्वच संघ करत असतात. कोरोना काळातही सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत सरांनी आम्हा सर्वांना खेळण्याची संधी दिली. जगदाळे सर क्रिकेटर म्हणून उत्तम खेळाडू आहेतच, पण एक सहकारी म्हणूनही त्यांच्यातील माणुसकी अधोरेखित करावीशी वाटते. फक्त खेळासाठी आलेल्या वकिलांनाच नाही तर राज्यभरातून कोणताही वकील कोणत्याही कामासाठी सरांकडे आला तर त्याचे काम झालेले असणारच याची आम्हाला वेळोवेळी प्रचिती आली आहे. अपार मेहनत, स्पर्धेला कोणतेही गालबोट लागणार नाही याची काटेकोर काळजी घेणारे, लोकांच्या मदतीला जाणीव ठेवून धावणाऱ्या जगदाळे सरांना त्यांच्या पत्नी सौ. संगिता यांच्यासह संपूर्ण कुटूंबाची भक्कम साथ मिळते आहे हे कौतुकास्पद आहे. मी स्वतः शिवसैनिक आहे, मी बाळासाहेबंना जवळून अुनभवले आहे, ऐकले आहे, त्यांच्याठायी असणारा स्पष्टवक्तेपणा मला नेहमीच माझे मित्र विवेकानंद जगदाळे यांच्या स्वभावात जाणवत आला आहे. सच्चेपणात कोणतीही तडजोड न करणारा आमचा हा मित्र, वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेचा भीष्म पितामह, फक्त वकीलच न राहता त्याने आता लोकप्रतिनिधीत्व करावे हीच आमची सदिच्छा !

– अ‍ॅड. धर्मेंद्र भोपळे, बीड

— — —

वकील खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारा आपला माणूस

नाशिकचे अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे सर म्हणजे आपुलकीने सहकार्य करणारा, वकिलांमधील खेळाडूंना हक्काचा प्लॅटफॉर्म देणारा आपला माणूस असेच म्हणावे लागेल. २०१५ मध्ये नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेत मी द्विशतक झळकावले होते. मी मूळचा परभणीचा, मात्र त्यावेळी औंरगाबाद संघाकडून खेळत होतो. सरांनी माझा खेळ हेरला होता, त्यानंतर २०१६ मध्ये सांगली बार असोसिएशनने सांगली येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र अ‍ॅडव्होकेटस प्रिमियर लिगसाठी त्यांनी मला त्यांच्या स्वतःच्या जगदाळे वॉरियर्स टिमसाठी आयकॉन प्लेयर म्हणून निवडले. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा होती. त्यावेळी संजय घोडावत आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये आम्ही पुणे संघावर बाजी मारली होती. तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण होता. सरांनी माझ्या पाठीवर मारलेली कौतुकाची थाप खूपच मोलाची होती. फक्त नाशिकमध्येच नाही, तर कुठेही खेळायला जायचं असेल तर सरांचे सहकार्य आणि प्रोत्साहन असतेच. ते वकील कमी आणि क्रिकेटरच अधिक वाटतात. मी त्यांचा लाडका खेळाडू आहे, त्यामुळे त्यांचे आपुलकीचे सहकार्य फक्त खेळापुरतेच नाही तर व्यक्तिगत पातळीवरही होतेच. राज्यभरातील अनेक वकिलांना खेळाची आवड आहे. मात्र रोजच्या दगदगीत आपली आवड जपणे शक्य होत नाही. या स्पर्धांच्या आयोजनामुळे वकिलांमधल्या क्रिकेटर्सना एक हक्काचा, सन्मानाचा प्लॅटफॉर्म सरांनी कायमस्वरुपी दिला आहे. दरवर्षी दीड ते दोन हजार वकील खेळाडू या स्पर्धेला उपस्थिती लावतात. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था इथे चोख राखली जाते. राज्यभरातील वकिलांना अनेक अर्थाने पाठबळ देणाऱ्या जगदाळे सरांच्या या उपक्रमातून सहभागी वकील सकारात्मक ऊर्जा घेवूनच परत फिरतात, यात शंका नाही.

– अ‍ॅड. अल्ताफ साहा, परभणी

— — —

वकिलांमधील सांघिकता टिकवणारा अजातशत्रू वकीलमित्र

नाशिकला डिसेंबरच्या थंडीत येणं म्हणजे मुंबई, ठाणेकरांसाठी आनंददायीच असतं. नाशिकच्या आमच्या मित्राने अर्थातच अ‍ॅड. विवेकानंद जगदाळे यांनी २०१३ पासून आम्हा राज्यभरातील वकीलमित्रांना हा आनंद दिला आहे. २०१३ च्याआधी राज्यात विविध ठिकाणी वकिलांच्या क्रिकेट स्पर्धा व्हायच्या, मात्र त्यात विखुरलेपणा होता. २०१३ मध्ये आमचा क्रिकेटप्रेमी जगदाळेंशी परिचय झाला आणि मुक्कामी क्रिकेट स्पर्धा आयोजित करता येतील का या चर्चेला पूर्णविराम मिळाला. सुरुवातीला तीन दिवसांच्या साखळी स्पर्धेचे जगदाळेंनी यशस्वी आयोजन केले. नाशिक बाहेरुन आलेल्या खेळाडूंची राहण्याची सोय झाली. स्वाभाविकच पुढच्या वर्षी अशाप्रकारच्या क्रिकेट स्पर्धेची विचारणा आणि मागणी पुढे आली. त्यातूनच राज्यस्तरीय वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेला आकार आला. मुक्कामी स्पर्धेमुळे राज्यभरातून आलेल्या वकिलांच्या गाठीभेटी होवू लागल्या, मैत्री वाढू लागली, याच सर्वांनाच फायदाही झालाच. मी सिनियर असल्याने आजवर जगदाळेंनी मला स्पर्धेबाबतच्या कोणत्याच गोष्टीसाठी कधी नकार दिला नाही. यंदाही कोरोना काळ असतानाही आम्हा सर्वांची मागणी लक्षात घेत कमी कालावधीमध्ये त्यांनी सर्वप्रकारचे परवाने मिळवून स्पर्धेचे उत्तम नियोजन केले. इथे फक्त खेळ होतो, कोणत्याही प्रकारचे हेवेदावे, राजकारण यात नसते, म्हणूनच या स्पर्धेत सहभागी होणे प्रत्येकासाठी आनंददायी असते. अनेकदा काहींची नाराजी ओढवते पण ती क्षणिक असते. जगदाळेंसारख्या अजातशत्रू मित्रासोबत फार काळ नाराजी कोणीच ठेवू शकत नाही, त्यामुळे सगळे पुन्हा एकत्र येतातच. हीच तर या खेळाची आणि या मोठ्या मनाच्या माणसाची खासियत आहे. कोरोना काळात सगळाच मित्र परिवार अस्वस्थ होता. आम्ही आमच्या मित्रांना, काहींनी परिवारातील सदस्यांना गमावलं आहे. या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे आयोजन खूपच आव्हानात्मक होते. जगदाळेंनी हे आव्हान पेलले आहे. खेळासाठी आलेल्या प्रत्येक खेळाडूची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. जगदाळे खऱ्या अर्थाने मोठ्या मनाचा माणूस आहे. वकिलांच्या विखुरलेल्या काही प्रमाणात विस्कळीत असणाऱ्या वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेला एकसंघ ठेवण्याचे काम माझ्या या अजातशत्रू वकीलमित्राने केले आहे. वकिलांमधील सांघिकता वाढवण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

– अ‍ॅड. अलीम शेख, ठाणे

 

(लेखिका नामवंत पत्रकार असून त्यांनी तरुण भारत, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, पुण्यनगरी, प्रहार या दैनिकांमध्ये उपसंपादक ते फिचर एडिटर अशा विविध पदांवर काम केले आहे. सध्या त्या नाशिकच्या जिल्हा न्यायालयात वकिली करत आहेत.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button