कोलकाता : विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर सातत्याने निशाणा साधत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा संपूर्ण देशात पराभव होताना मला पहायचे आहे…’खेला होबे’, अशा शब्दांत त्यांनी रणशिंग फुंकले आहे.
ममता बॅनर्जींनी एक दिवस आधी गोव्यातही भाजपवर निशाणा साधला होता. भाजपकडून चारित्र्य प्रमाणपत्राची गरज नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. त्या म्हणाल्या, मी तुमच्याशी स्पर्धा करायला आलेलो नाही. बाहेरच्या लोकांनी गोवा नियंत्रित करावा, असे मला वाटत नाही. मी देखील ब्राह्मण कुटुंबातील आहे, मी ब्राह्मण आहे. मला भाजपकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही.
दरम्यान, केवळ पश्चिम बंगालमध्ये दबदबा कायम ठेवणार्या तृणमूल काँग्रेसने इतर राज्यात देखील हातपाय पसरण्यासाठी सुरुवात केली. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा पराभव केल्यानंतर, ममता बॅनर्जी सतत इतर राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेससाठी जोरदार तयारी करत आहेत. अनेक काँग्रेस नेते तृणमूलमध्ये सामील झाल्याच्या संदर्भात तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी दावा केला की गोवा, उत्तर प्रदेश आणि पंजाब सारख्या राज्यांमध्ये जेथे २०२२ च्या सुरुवातीला निवडणुका होणार आहेत, तेथे भाजपचा सूर्यास्त झाला आहे आणि हा कल देशभरात दिसून येईल. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भगव्या संघटनेबद्दल मोठे दावे करण्याऐवजी काँग्रेसने भाजपविरुद्ध योग्य मार्गाने लढले पाहिजे.
एक गुजराती देशभर फिरू शकतो, तर बंगाली का नाही?
गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर तृणमूल काँग्रेसने नव्यानेच युती केली आहे. यानंतर आयोजित एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. एक गुजराती देशभर फिरू शकतो, तर बंगाली का नाही, अशी खोचक विचारणा ममता बॅनर्जी यांनी केली.
मला सांगितले जाते की मी बंगाली आहे. मग ते कोण आहेत? ते गुजराती आहेत? आपण असे म्हणतो का, की ते गुजराती आहेत म्हणून इथे येऊ शकत नाहीत? एक बंगाली देशाचे राष्ट्रगीत लिहू शकतो, पण गोव्यात येऊ शकत नाही? तुम्ही कधी हा प्रश्न उपस्थित केला आहे का की, गांधीजी बंगाली आहेत की नाहीत, उत्तर प्रदेशातील आहेत की, गोव्यातले? राष्ट्रीय नेता तोच असतो जो सर्वांना सोबत घेऊन पुढे चालत असतो, असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांच्या पक्षाचा गोव्याच्या राजकारणात प्रवेश झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण तृणमूल काँग्रेस हा गोव्यातील नेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हे, तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी गोव्याच्या राजकारणात उतरला आहे. हे लोक राष्ट्रीय नेते कसे बनतील? ते गोवा गुजरातमधून चालवतात. पण गोवा गुजरात किंवा दिल्लीतून चालणार नाही. गोव्याचे लोकच गोवा चालवणार, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
मतदानाची वेळ आली तेव्हा मोदी गंगेत डुबकी मारतात
आम्ही फक्त मतदानाची वेळ आली की, गंगेच्या तीरावर पूजेसाठी जात नाही. मतदानाची वेळ आली तेव्हा मोदीजी गंगेत डुबकी मारतात. तपस्येसाठी उत्तराखंडमधील एका मंदिरात जातात. निवडणुकीची वेळ आली की स्वतः पुरोहित (पुजारी) बनतात. त्यांना तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण वर्षभर ते कुठे असतात? ज्या भागात गंगा नदी वाहते, त्या यूपी सरकारने कोरोनाबाधित मृतदेह नदीत फेकले. त्यांनी गंगामाता अपवित्र केली. त्यांच्याकडे कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांची संख्या (डेटा) नाही. आम्ही गंगेला आमची आई म्हणतो आणि म्हणून भाजपच्या लोकांनी कोरोनाचे मृतदेह गंगेत फेकले हे आम्हाला आवडत नाही, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.