राजकारण

खडसेंचे ईडीला सहकार्य, ते घाबरत नाही : नवाब मलिक

मुंबई : ईडी किंवा इतर यंत्रणेमार्फत कितीही चौकशा लावल्या तरी आज ना उद्या सत्य समोर येणार आहेच. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सांगितले.

ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने एकनाथ खडसे यांची चौकशी सुरु आहे. एकनाथ खडसे हे या चौकशांना सामोरे जाताना यंत्रणेला सहकार्य करत आहेत. त्यांनी काही केलं नाही त्यामुळे ते घाबरत नाहीत. यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

ज्या प्रकरणात ईडी एकनाथ खडसे यांची चौकशी करत आहे त्याचाच आधार घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांचं खच्चीकरण केले होते. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही झाली. आता ईडीच्या माध्यमातून सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चौकशी सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. भाजपला वाटत असेल की, या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांवर दबाव निर्माण करुन राजकीय गणितं बदलतील तर तो भाजपचा गैरसमज आहे. कुणीही या यंत्रणेला घाबरत नाही, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.

यंत्रणांचा दुरुपयोग करणं हे भाजपचं काम आहे. निव्वळ महाराष्ट्रच नव्हे तर पश्चिम बंगाल, युपी असतील तिथे विरोधकांना त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम या यंत्रणांच्या माध्यमातून होत आहे असंही नवाब मलिक म्हणाले.

जगभरात आणि देशभरात ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकार, नरेंद्र मोदी आणि भाजपवर लोक उघडपणे बोलत आहेत, ते कसं थांबवावं यासाठी केंद्र सरकारच्या ट्विटरवर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. कुठल्याही देशात त्यांच्या कायद्यांतर्गत कुठलीही यंत्रणा असेल किंवा आस्थापना असेल त्यांच्यावर नियंत्रण करणं किंवा कारवाई करणं हा अधिकार असतो. परंतु केंद्र सरकार ट्वीटरसोबत का भांडतंय? हा प्रश्न आहे असेही नवाब मलिक म्हणाले. लोकांना स्पष्टपणे मत मांडायला ट्विटरसारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. त्यामुळे लोकांच्या बोलण्याच्या अधिकारावर गदा आणणं हे योग्य ठरणार नाही, असेही मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button