ठाणे : राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना काल दुपारी पालिसांनी अटक केली होती. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना महाड पोलिसांनी जामीनही मंजूर केला. यासर्व घडामोडीं दरम्यान राज्यभर राणेंविरोधात शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. यात ठिकठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलनं केली. आज ठाण्यात याचा दुसरा अंक पाहायला मिळतोय. ठाण्यात आज ठिकठिकाणी राणेंवर झालेल्या कारवाईच्या समर्थनार्थ शिवसैनिकांनी राणेंना डिवचण्यासाठी पोस्टर लावले आहेत.
ठाण्यातील मुख्य रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर हे पोस्टर झळकत असून यात ”बरळत ‘रा(ह)णे’ तुमचं काम आहे, जीभ ताब्यात ठेवा शिवसैनिक ठाम आहे…आज, उद्या, कधीही…मा. उद्धवजींसोबतच.”, असा आशय छापण्यात आला आहे. पोस्टरवर ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नावं आहेत. या दोन्ही नेत्यांकडून हे पोस्टर ठाण्यातील उड्डाणपुलांवर लावण्यात आले आहेत. राणेंना झालेली अटक म्हणजे त्यांना देण्यात आलेला राजकीय शह असल्याचं या पोस्टरमधून शिवसैनिकांकडून दाखवून देण्यात आलं आहे. त्यामुळे या पोस्टरची चांगलीच चर्चा ठाण्यात सुरू आहे.