Top Newsराजकारण

गोव्याचे आयाराम-गयारामांचे विचित्र राजकारण; ५ वर्षात ४० पैकी २४ आमदारांनी सोडले पक्ष

पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. तिकिट वाटपावरून भाजपचे टेन्शन मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. निवडणुकीसाठी यादी जाहीर केल्यानंतर बंडखोरी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकरही भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आता गोवा विधानसभेत अजब माहिती समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत ४० पैकी तब्बल २४ आमदारांनी पक्ष सोडला आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळूनही त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. भाजपने मोठी राजकीय खेळी करून सत्ता स्थापन केली. तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांना पुन्हा गोव्यात पाचारण करून पक्षाने सत्ता स्थापनेचा मार्ग प्रशस्त करून घेतला. मात्र, त्यानंतर काँग्रेस आणि अन्य पक्षांमधून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग झाले. मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतरही भाजपमध्ये आमदारांचे इन्कमिंग सुरूच राहिले.

मनोहर पर्रिकर यांनी विश्वासदर्शक ठराव सादर करतेवेळी माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणे यांचे पुत्र विश्वजित राणे यांनी सभागृहातून वॉकआऊट केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विश्वजित राणे यांना मंत्रिमंडळातही स्थान देण्यात आले होते. यानंतर वर्षभरातच दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपला पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातही फूट पडल्याचे पाहायला मिळाले. मगोपच्या ३ पैकी २ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पैकी मनोहर बाबू आजगांवकर यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. इतकेच नव्हे तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते असलेले चंद्रकांत कवळेकर यांनीही पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

तृणमूल काँग्रेसचा गोव्यात प्रवेश

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली, ती काँग्रेसने जिंकली. मात्र, त्या जागेवर निवडून आलेले बाबूश मोन्सेरात यांनी आपली पत्नी आणि ८ आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर काँग्रेस नेते रवी नाईक आणि फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही पक्ष सोडून कमळ हाती धरले. अलीकडेच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने गोव्यात एन्ट्री घेतल्यावर राष्ट्रवादीचे काही आमदार तृणमूलमध्ये सामील झाले. यामध्ये केवळ काँग्रेस नाही, तर भाजप नेत्यांनीही पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर भाजपच्या अलीना सल्ढाना यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. तसेच माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते मायकल लोबो यांनीही पक्षाला रामराम करत काँग्रेसमध्ये सामील झाले. यासह भाजप नेते प्रवीण झांट्ये हेही भाजप सोडून मगोपमध्ये सामील झाले.

उत्पल पर्रिकर यांना आम आदमी पक्षाची खुली ऑफर !

एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत असून, काँग्रेससह तृणमूलनेही कंबर कसल्याचे चित्र आहे. मात्र, जागा वाटपासंदर्भात भाजपमध्ये मोठी बंडखोरी होण्याचे शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर भाजप सोडणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्पल पर्रिकर आम आदमी पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

गोव्यात आम आदमी पक्ष जोरदारपणे मैदानात उतरला आहे. अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गोव्यासाठी आपले व्हिजन मांडले. आताच्या घडीला केजरीवाल यांनी घरोघरी भेटी देऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. गोव्यात येताच केजरीवाल यांनी सांत आंद्रे आणि शिरोडा या मतदारसंघांना भेटी दिल्या. घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास दिल्लीप्रमाणे गोव्यातील आरोग्य, शिक्षण व्यवस्था बदलणार आहोत. तसेच वीजही मोफत देणार आहोत. सरकार आल्यास बेरोजगारांना महिना ३ हजार मिळतील. तसेच सरकार झाल्यावर ६ महिन्यात मायनिंग सुरु केली जाईल. सहा महिन्याच्या आत जमीन हक्क मिळतील. १८ वर्षांवरील महिलांना ७ हजार देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी यावेळी गोवेकरांना दिले.

दिल्लीला आम्ही काम केले आहे. आमचा डीएनए दिल्लीतील काम बघितल्यावर कळतो. आमचा पक्ष केवळ एकमेव प्रामाणिक पक्ष आहे. तोडफोडीचे राजकारण आम्हाला काळत नाही. आम्ही तृणमूल काँग्रेससोबत जाणार नाही. उत्पल पर्रिकर आपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत आहे. तसेच मनोहर पर्रिकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, असे सांगत संजय राऊत यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आधी आपले पाहावे, असा पलटवारही केजरीवाल यांनी केला.

महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, त्यासाठी आम्ही गोव्यात प्रयत्न करु : संजय राऊत

गोव्यात महाविकास आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यात शिवसेनेला यश येताना दिसत नाही. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. जे महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. सामान्यातील सामान्य माणसाला त्यांनी उमेदवाऱ्या देऊन आमदार, खासदार आणि मंत्री केले. गोव्यात हे होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गोव्यातील सामान्य लोकांना प्रस्थापितांविरुद्ध आम्ही उभा करू. गोव्यातील राजकारण हे प्रस्थापितांच्या हाती गेलेले आहे. म्हणजे भूमाफिया, भ्रष्टाचारी, ड्रग्ज माफिया यांच्या हातात गोव्याच्या राजकारणाची सूत्रे आहेत आणि ते गोव्याचे भविष्य ठरवतात. हे जर मोडायचे असेल, तर गोवेकरांनी आपल्यातील सामान्य लोकाना निवडणुकीत मतदान करावे आणि निवडून आणावे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे.

गोव्याचे राजकारण जर तुम्ही पाहिले, तर मोजके १०-१२ लोक गोव्याचे राजकारण करतात. तेच कधी या पक्षात असतात, तर कधी त्या पक्षात असतात, तेच ठरवतात गोव्याचे भविष्य, असे सांगत राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तर महाराष्ट्रातही आघाडी आहे, काँग्रेसही आमच्यासोबत आहे. परंतु, गोव्यात त्यांची जागा वाटपासंदर्भात काही मजबुरी असेल, आमची चर्चा देखील चांगली सुरू होती, मात्र नाही होऊ शकले. राष्ट्रवादी काँग्रेसचीदेखील त्यांच्याशी चर्चा फिस्कटली. तर याचा अर्थ असा नाही की आम्ही निवडणूक लढणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस मनाने सत्तेवर आलेली आहे, ज्या पद्धतीने त्यांचा वावर आहे. असू द्या, आम आदमी पार्टीचे तसेच दिसत आहे. त्यांना केवळ शपथ घेणेच बाकी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात दारोदारी प्रचार करत होते. दिल्लीत तर कोरोना एवढा वाढत आहे आणि इथे दारोदारी जात आहेत. तुम्ही तुमच्या पक्षाचा विचार द्या, जेव्हा ते स्वत: दारोदार जात होते, तेव्हा मी स्वत: त्यांना पाहिले आहे. चांगली गोष्ट आहे आपल्या पार्टीचा प्रचार करत आहेत, परंतु पाहूयात गोव्यात काय होतय, असे संजय राऊत म्हणाले.

तृणमूलचा मैत्रीचा हात, तर काँग्रेसचा नकार

भाजपविरोधी महाआघाडी करण्यासाठी तृणमूलने पुढे केलेला मैत्रिचा हात काँग्रेसने नाकारला आहे. एकत्र येण्याऐवजी तृणमूल व काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस व तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये या मुद्यावरून चांगलीच जुंपली आहे.

भाजपविरोधी महाआघाडीच्या मुद्यावर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस पक्षात सध्या युद्ध सुरू आहे आणि तेही अगदी वरिष्ठ पातळीवर. तृणमूलच्या गोवा प्रभारी माहुआ मोईत्रा यांनी शुक्रवारी काँग्रेसला महाआघाडीचा प्रस्ताव दिल्याचे सांगून महाआघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टत टोलविला होता. त्यांच्या या कथित प्रस्तावाला उत्तर देताना काँग्रेसचे केंद्रीय नेते के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेस पक्ष हा सत्ता मिळविण्यास सक्षम असल्याचे सांगत महाआघाडीच्या मुद्यावर पक्षश्रेष्ठी राहुल गांधी यांच्याशी झालेल्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

के. सी. वेणुगोपाल यांच्या स्पष्टीकरणानंतर खुद्द काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनीही ट्विट करून खुलासा केला आहे. तृणमूल नेत्या मोहुआ मोईत्रा या दिल्लीत कुणाकडून प्रतिसाद मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबद्दल गुंडूराव यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपविरुद्ध महाआघाडी स्थापन करण्याच्या गोष्टी करतानाच काँग्रेस कमकुवत करून भाजपविरोधी मतांचे विभाजन करीत आहेत. हे कुणाच्या फायद्यासाठी करीत आहेत, असा प्रश्न गुंडूराव यांनी मोईत्रा यांना केला आहे. दरम्यान, तृणमूलच्या खासदार सुष्मिता देव यांनी गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे बहुमत असतानाही सरकार का स्थापन केले नाही? असा प्रश्न विचारत पी. चिदंबरम यांनी उत्तर देण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button