‘करवटें बदलते रहे सारी रात हम’ या गाण्याचा अनुभव काय फक्त तरुण वयातच येतो का, फक्त प्रेमीजनांनाच येतो का ? नाही, तो पोक्त वयातही येतो, राजकारण्यांनाही येतो. रात्रीतून अनेकदा फक्त मधुमेहींनाच उठावं लागतं का ? नाही, एखाद्या उपमुख्यमंत्र्यालासुध्दा रात्रीतून अनेकदा उठावं लागतं. फरक फक्त इतकाच की, मधुमेहींना लघुशंकेसाठी वारंवार उठावं लागतं, तर एखाद्या उपमुख्यमंत्र्याला आपलं सरकार रात्रीतून कोणी पाडलं तर नाही ना या शंकेपोटी रात्री वारंवार उठून वेगवेगळे चॅनल्स पाहावे लागतात ! आज उधोजीराजेंनीही रात्रभर ‘करवटें बदलते रहे सारी रात हम’चा अनुभव घेतला ; तो काही सरकार पडण्याच्या भितीमुळे नाही. सरकार पडण्याची भीती त्यांना अजिबात नाही. ते वाचविण्यासाठी त्यांचे ‘घालीन लोटांगण – -‘ छाप ‘वाचाळ संपादक’ समर्थ आहेत. उधोजीराजेंना चिंता आहे ती रात्रीतून ‘त्यांनी’ कोणाला ‘उचलला’ तर नाही ना याची. एखाद्या राजीनामा दिलेल्याला ‘उचलला’ तर हरकत नाही, पण एखाद्या पदावर असलेल्याला ‘ उचलला’ तर ? या चिंतेमुळेच रात्रभर त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. हे म्हणजे त्या कोरोनासारखंच आहे. एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर कोणाला कितीही प्रयत्न करू देत , परमेश्वराची कृपा झाली तरच माणूस वाचतो. इथेही ‘त्यांनी’ केलेली टेस्ट पॉझिटिव्ह आली की माणूस ‘गेलाच’ म्हणून समजा. कोणी कितीही प्रयत्न करू देत , ‘ दिल्लीश्वरां’ची कृपा झाली तरच माणूस वाचतो.
नेमक्या अशाच विचारांनी उधोजीराजेंचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नव्हता. मध्यरात्री कधीतरी थोडा डोळा लागला तर एका घारीने आकाशातून खाली झेपावत, बिळात लपण्याची धडपड करणाऱ्या उंदराच्या एका पिल्लाला क्षणार्धात उचलून परत आकाशात झेप घेतल्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्यांची झोपच उडून गेली. मग रात्रभर फक्त, ‘करवटें बदलते रहे सारी रात हम’ ! पहाटे पोर्चमध्ये गाडी आल्याचा आवाज ऐकून , बाळराजे घरी आलेले दिसतात, म्हणजे पाच वाजले असतील, असा विचार करून ते उठले आणि त्यांनी मास्क न घालताच, सॅनिटायझरने हात न धुताच, रिमोटवर डिसइंफेक्टंट न मारताच रिमोट हातात घेऊन घाईघाईने न्युज चॅनल सुरू केला. चॅनल सुरू होताच, ‘ उघडा डोळे बघा नीट.’ असं कानावर पडलं आणि ते प्रचंड दचकले. पहाटे पहाटे ही बया , ‘ उघडा डोळे बघा नीट’ म्हणतेय म्हणजे नक्कीच काहीतरी विपरीत घडलं असणार असा विचार करून त्यांनी गपकन डोळे घट्ट मिटून घेतले आणि रिमोटने टीव्ही बंद केला. असं बोलून आपल्याला घाबरवण्यासाठी त्या देवानाना नागपूरकरांनी या बयेला ‘मॅनेज’ तर केलं नसेल ना , अशी शंकाही क्षणभर त्यांच्या मनात येऊन गेली. आता कोणालातरी फोन करावा आणि नेमकं काय घडलं आहे याचा अंदाज घ्यावा या विचाराने त्यांनी शेजारीच पडलेला मोबाईल हातात घेतला , पण आपण ज्याला फोन करू नेमकं त्यालाच जर ‘ त्यांनी’ ‘उचललेलं’ असलं आणि त्याचा मोबाईल ‘ त्यांच्या’ ताब्यात असला तर ? उगाच कशाला, ‘आ बैल मुझे मार .’ करून घ्या, या विचाराने त्यांनी हातात घेतलेला मोबाईल परत जागेवर ठेवून दिला आणि ते शांतपणे डोळे मिटून बसून राहिले.
हल्ली वारंवार अशी अशुभ, भयसूचक स्वप्नं कशी पडू लागली आहेत ? परवासुध्दा स्वप्नात असेच एक शुभ्र वस्त्रांकित, शुभ्र दाढीधारी, वरकरणी तरी एखाद्या संतासारखे दिसणारे वयोवृद्ध गृहस्थ आले आणि , ‘ जेनू काम तेनु आवे , बीजू करे सो गोता खावे ।’ असं दरडावून सांगून गेले होते.आजपासून दुर्गासप्तशतीचे पाठ वाचायला सुरुवात करावी का, त्याच्यामुळे म्हणे भयसूचक स्वप्नं दिसायचं बंद होतं आणि येणारी संकटं टळतात, असाही एक विचार उधोजीराजेंच्या मनात येऊन गेला.तोच शेजारचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर चुलतराजेंच नाव पाहून , कपाळावर आठया टाकत त्यांनी फोन कानाला लावला.
उधोजीराजे – (तुटकपणे) हं बोल. कसा फोन केलास ?
चुलतराजे – (मिश्कीलपणे ) अरे , काही नाही, सहज तुझी चौकशी करावी म्हणून फोन केला.
उधोजीराजे – (वैतागून ) एवढया पहाटे उठून कसली चौकशी करतोस बाबा माझी ?
चुलतराजे – (मिश्कीलपणे ) काही नाही, म्हटलं ‘त्यांनी’ रात्रीतून कोणाला ‘ उचललं’, विचारावं तुला म्हणून फोन केला होता.
उधोजीराजेंच्या हातातून मोबाईल गळून पडला.