भाजप आ. नितेश राणे यांची कणकवली पोलिसांकडून ५ तास चौकशी
पोलीस कोठडी संपणार, जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी
कणकवली : शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना अधिक तपासासाठी सावंतवाडी येथून कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजल्यापासून दुपारी ३.३० पर्यंत म्हणजे पाच तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर नितेश यांना गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. मात्र, पोलिसांनी त्यांच्याकडे कोणत्या मुद्द्यांबाबत चौकशी केली याबाबतचा तपशील समजू शकला नाही. तपासाचा एक भाग म्हणून राणे यांना सिंधुदुर्ग पोलिसांनी गोव्यात नेले असल्याची शक्यता आहे. राणे कुटुंबीयांच्या गोव्यातील कळंगुट येथील हॉटेलवर चौकशीसाठी त्यांना नेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, नितेश राणेंची पोलीस कोठडी आज संपणार असून जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.
परब हल्लाप्रकरणी नितेश राणे बुधवारी न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आमदार नितेश राणे यांचा ताबा कणकवली पोलिसांकडे देण्यात आला होता. बुधवारी रात्री ओरोस जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सावंतवाडी येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा चौकशीसाठी त्यांना कणकवली ठाण्यात आणण्यात आले. यावेळी नितेश व त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांची कणकवली पोलीस ठाण्यात स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली.
नितेश यांना कणकवली पोलीस स्थानकातून गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. त्यामागचे नेमके कारण समजले नाही. परब हल्ल्याचा कट पुण्यात रचला गेला, अशी माहिती समोर येत होती.