केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आताच्या पूरस्थितीचा दुरान्वये संबंध नाही : अजित पवार

मुंबई : केंद्राने जाहीर केलेली रक्कम आणि आता असणाऱ्या पूरजन्य परिस्थितीचा दुरान्वये संबंध नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचा पंचनामा केला आहे. २०२० मध्ये महाराष्ट्रावर जे नैसर्गिक संकट आले त्यावेळी केंद्राची टिम पाहणी करण्यासाठी आली होती. त्यावेळी ३ हजार ७०० कोटींची मागणी करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यातील हिशोब करुन ७०० कोटी मंजूर करण्यात आले तेही दादा भुसे यांनी सांगितले आहे असेही अजित पवार म्हणाले.
आता आम्हीही मुख्यमंत्र्यांचे पत्र दिल्लीत पाठवून रस्ते, शेती, घरे, दुकाने यांच्या झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानीचा इत्यंभूत अहवाल तयार करून पाठवणार आहोत. शिवाय केंद्राने या नुकसानीच्या पाहणीसाठी तातडीने टीम पाठवावी अशा पध्दतीने कळवले आहे. गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले तशा पध्दतीने महाराष्ट्राला पॅकेज देऊ शकतात परंतु तो त्यांचा अधिकार आहे असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.
गेल्या काही वर्षापासून राज्यात जोरदार पाऊस होत आहे. ढगफुटीसारखा पाऊस होत असल्याने महापूर येत आहे. त्यामुळे भूगर्भात काही बदल होत आहेत का? याचा अभ्यास राज्य सरकार करणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येणार आहे, अशी माहिती अजित पवार यांनी आज दिली.




