नवी दिल्ली: बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आली आहे. कंगनाने केलेल्या विधानांवरून संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच आता शीख समाजासंदर्भात केलेल्या एका विधानावरून दिल्ली विधानसभेने कंगनाला समन्स बजावले असून, ६ डिसेंबर रोजी एका समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अलीकडेच देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. तसा प्रस्तावही केंद्रीय मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला आहे. मात्र, पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्याचा निर्णय कंगना रणौतला पटला नाही. त्यावर नाराजी व्यक्त करत कंगनाने शेतकरी आंदोलकांना खालिस्तानी दहशतवादी म्हटले होते. यानंतर पुन्हा एकदा कंगनाविरोधात देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
या वादग्रस्त वक्तव्यानंतर कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, आता तिला थेट दिल्ली विधानसभेने समन्स बजावले आहे. आमदार राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली समितीने सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टबाबत कंगनाला ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हजर राहण्यास सांगतिले आहे. राघव चड्ढा यांच्या नेतृत्वाखाली शांती आणि सद्भाव संबंधी समितीने कंगनाला समितीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे रद्द केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरील स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली. यानंतर पुन्हा नवीन वाद निर्माण झाला. खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतीलही, पण एका महिलेला विसरून चालणार नाही. देशाच्या एकमेव महिला पंतप्रधानाने या खलिस्तानींना आपल्या चपलेखाली चिरडले होते. इंदिरा गांधींनी स्वत:च्या जीवाची किंमत देत यांना डासांसारखे चिरडलं आणि देशाचे तुकडे होण्यापासून वाचवले. इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतरही इतक्या दशकांपासून ते त्यांच्या नावाने थरथर कापतात. त्यांना असाच गुरु पाहिजे, असे कंगनाने म्हटले होते.