काँग्रेसमध्ये हालचालींना वेग; कमलनाथ होणार कार्यकारी अध्यक्ष?
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद बऱ्याच काळापासून रिक्त आहे. यामुळे पक्षावर मोठी नामुष्की ओढविली आहे. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्ष पद सो़डले होते. तेव्हा पासून रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाला कार्य़कारी अध्यक्ष देण्यासाठी दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या पदावर मध्य प्रदेशची सत्ता गमावलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर कमलनाथ हे आज १० जनपथ येथे पोहोचले असून तिथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी उपस्थित आहेत. काँग्रेसला अध्यक्ष हवा, अशी चर्चा गेल्या काही काळापासून जोर धरू लागली आहे. यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकनिष्ठ असलेले कमलनाथ असावेत असा विचार केला जात आहे. कमलनाथ यांनी ही जबाबदारी स्वीकारली तर तो एक मोठा बदल ठरणार आहे.
सध्यातरी त्यांना कार्यकारी अध्यक्ष केले जाण्याची शक्यता असली तरी देखील सोनिया गांधी याद्वारे अनेक संकेत देत आहेत. लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर पक्षाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. तिकडे पंजाबमधील वाद देखील थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे पक्षाला अध्यक्ष असला तर एकसूत्रता येईल आणि नेत्यांमध्ये देखील विश्वासाचा मेसेज जाईल असे वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे.