Top Newsराजकारण

कालीचरण महाराजाला अखेर खजुराहो येथून अटक

भोपाळ : महात्मा गांधी यांच्याबाबत धर्म संसदेमध्ये अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराज याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कालीचरण महाराजाने महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच त्याच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान, छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील खजुराहो येथून कालीचरण महाराज याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये दोन दिवसीय धर्म संसदेचे आयोजन करण्यात आले होते. स्वामी परमात्मानंद, संत रामप्रिया दास, संत त्रिवेणी दास, हनुमान गढी अयोध्येचे महंत रामदास, साध्वी विभा देवी, जुना आखाड्याचे स्वामी प्रबोधानंद आणि अकोल्याचे कालीचरण यांच्यासह अनेक संतांनी धर्म संसदेला हजेरी लावली होती. तिथे कालीचरण महाराजाने महात्मा गांधींना शिव्यांची लाखोली वाहिली होती. यावेळी त्याने खालच्या दर्जाचे असे शब्द वापरले आहेत. कालीचरण महाराजाच्या या विधानामुळे वाद पेटला होता. कालीचरण महाराज हा फक्त गांधीजींना शिविगाळ करुन थांबला नाही तर गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचेही त्याने आभार मानले होते. त्याच्या कृतीचं चक्क कौतुक केलं होतं.

त्यानंतर कालीचरण महाराज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस ठाण्यात भादंवि कलम २९४ आणि ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. रायपुरचे माजी महापौर आणि सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अटकपूर्व जामीन फेटाळला

दरम्यान, महात्मा गांधींविरोधात वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाचा अटकपूर्व जामीन अर्ज महाराष्ट्रातील अकोला जिल्हा न्यायालयाने कालच फेटाळून लावला. रायपूर येथे रविवारी झालेल्या धर्मसभेत कालीचरण महाराजाने आपल्या भाषणात महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द उच्चारत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद देशभरात उमटत आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रातून या वक्तव्याचा निषेध नोंदविला जात आहे. कालीचरणला अटक व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती.

कालीचरण महाराजाचं मूळ नाव अभिजीत धनंजय सराग आहे. तो आठवीपर्यंत शिकला आहे. अध्यात्माकडील ओढ्यामुळे शिक्षण सोडलं. हरिद्वारला जात दिक्षा घेतली. कालिभक्त म्हणून कालिचरण महाराज नाव धारण केलं. दोन वर्षांपूर्वी शिवतांडव स्तोत्र व्हिडीओमूळे देशभरात लोकप्रिय झाला. कट्टर हिंदूत्ववादाचे तो पुरस्कर्ता आहे. २०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत तो पराभूत झाला आहे.

कालीचरण बाबाविरोधात जितेंद्र आव्हाडांची ठाणे पोलिसात तक्रार

छत्तीसगडमधील धर्मसंसदेत कालीचरण बाबानं महात्मा गांधींबाबत संतापजनक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केलाय. महात्मा गांधींबाबत अपशब्दांचा वापर करतानाच कालीचरणनं नथुराम गोडसेंना नमन केलंय. त्यावरून जितेंद्र आव्हाड संतप्त झाले आहेत. बाबाविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच कालीचरण बाबानं आणखी एक व्हिडीओ शेअर करत फासावर द्या मात्र माफी मागणार नाही असं म्हणत वादाला आणखी फोडणी दिली. कालीचरण बाबाच्या संतापजनक वक्तव्याचे पडसाद राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही उमटेल. मविआ नेत्यांनी कालीचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून मंत्री जितेंद्र आव्हाडही पोलिसात गेले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button