राजकारण

भाजपने कितीही ताकद दाखवली तरी विजय ममता बॅनर्जी यांचाच : प्रशांत किशोर

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भाजप ताकदवान आहे. मात्र, ते १०० जागांपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवू शकणार नाहीत आणि तृणमूलचा विजय होईल. लोकांमध्ये ममतांविरोधात असंतोष नाही. त्या आतादेखील बंगालमधील एक लोकप्रिय नेत्या आहेत. ज्याला कोणाला बंगाल समजतं, तो सहज सांगू शकतो की टीएमसी आणि ममतांसाठी महिला मोठ्या प्रमाणात मत देतात. मी माझ्या ८-१० वर्षाच्या अनुभवात कोणतीही महिला नेता इतकी लोकप्रिय असल्याचं पाहिलं नाही. माझं असं मत आहे, की ममता बॅनर्जी मोठ्या अंतरानं विजय मिळवतील, असा दावा तृणमूल काँग्रेसचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी केला आहे.

प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यात त्यांनी टीएमसी आणि भाजपबद्दल (BJP) अनेक मोठी विधानं केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप ताकदवान असल्याचं म्हटलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी असा दावाही केला आहे, की यावेळीदेखील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोठ्या अंतरानं विजय मिळवतील. किशोर म्हणाले, बंगालमध्ये काही जागांवर सत्तेविरोधात लाट आहे, मात्र ती स्थानिक नेत्यांविरोधात आहे. याला पक्षानं दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

किशोर म्हणाले की, ‘मोदीजींची लोकप्रियता हा एक घटक आहे. ध्रुवीकरण, दलितांचा एक मोठा वर्ग भाजपाला पाठिंबा देत आहे आणि हिंदी भाषिकांवर भाजपची पकड आहे. हे सर्व घटक भाजपला निवडणुकीत मदत करतील. ते म्हणाले, की विरोधकांना निवडणुकीत कधीही कमकुवत समजू नये.

किशोर म्हणाले की, जो पक्ष दहा वर्ष सत्ते राहिल त्याच्याविरोधात सत्ताविरोधी लाट असणारच. मात्र, माझं काम हे समजून घेणं आहे, की लाट नेमकी कोणाविरोधात आहे. स्थानिक नेत्यांविरोधात, पक्षाविरोधात की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात. मात्र, या सगळ्याशिवाय बंगालमध्ये ममतांचाच विजय होणार, असा दावा त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button