Top Newsस्पोर्ट्स

के.एल. राहुल ‘वन डे’ संघाचा कर्णधार, तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार

नवी दिल्ली : बीसीसीआयने विराट कोहलीला टीम इंडियाच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं आणि त्या जागी रोहित शर्मावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आपली पहिली वन डे मालिका आफ्रिकेविरूद्ध खेळणार होता. पण दुखापतीमुळे रोहितने कसोटी आणि वन डे अशा दोन्ही मालिकांमधून माघार घेतली. त्यामुळे केएल राहुलला संघाचा कर्णधार तर जसप्रीत बुमराहला संघाचा उपकर्णधार निवडण्यात आलं. केएल राहुलनंतर अनेक खेळाडूंची नावं उपकर्णधारपदासाठी घेतली जात होती. पण बुमराहला उपकर्णधार केल्यामुळे दोन महत्त्वाच्या खेळाडूंसाठी ही एका अर्थी धोक्याची घंटाच असल्याचं म्हटलं जातं आहे.

टीम पेनने ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट बोर्डाने पॅट कमिन्सला संघाचं कर्णधार नेमलं. त्यातूनच प्रेरणा घेत कदाचित बीसीसीआयने बुमराहवर ही जबाबदारी सोपवली असावी अशी चर्चा आहे. पण त्यासोबतच बुमराह उपकर्णधार झाल्यामुळे श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांसाठी ही धोक्याची घंटाच समजली जातेय. हे दोघेही आयपीएलमध्येही कर्णधार म्हणून पाहायला मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने उत्तम कामगिरी करून दाखवली. त्यामुळे राहुलनंतर नेतृत्वाची धुरा सांभाळण्यासाठी निवड समितीची पहिली पसंती हे दोन खेळाडूच असतील अशी चर्चा होती. पण आता तरी तसं न झाल्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळात सातत्य ठेवणं आवश्यकच असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, बुमराहला भारतीय संघात नवी जबाबदारी दिल्याबद्दल माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी समाधान व्यक्त केलं. बुमराह हा शांत, संयमी आणि समजूतदार आहे. त्यामुळे त्याच्यावर ही जबाबदारी सोपवणं चांगला निर्णय असल्याचं प्रसाद म्हणाले.

भारताचा संघ : केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button