नवी दिल्ली : पंजाब दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठ्या त्रुटी असल्याच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेली समिती चौकशी करणार आहे. बुधवारी या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सुप्रीम कोर्टाच्याच निवृत्त न्या. इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक, पंजाबचे सुरक्षा महासंचालक आणि पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल यांचा समावेश असेल.
पंजाब सरकार, एसपीजी आणि स्थानिक पोलीस यांच्याकडून झालेल्या चुकीचं प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात आहे आणि त्यावर आज सुनावणी झाली. विशेष म्हणजे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आल्यानंतर, कोर्टानं केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्हींच्या चौकशीवर बंदी आणली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ६ जानेवारीला पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यावर होते. तिथं पंतप्रधान मोदी एका राजकीय रॅलीला संबोधित करणार होते. आधी ठरल्याप्रमाणे मोदींनी हेलिकॉप्टरनं सभास्थळी पोहोचणे अपेक्षीत होते. पण पावसाळी वातावरणामुळे त्यात अचानक बदल झाला आणि ते बाय रोड जाण्याचा निर्णय घेतला. त्याच प्रवासात हुसैनीवालापासून ३० कि.मी. अंतरावर मोदींच्या गाड्यांचा ताफा थांबवावा लागला आणि त्याला कारण होतं ते स्थानिकांनी चालवलेलं आंदोलन. ह्या आंदोलकांनी मोदींचा रस्ता ब्लॉक केला. वीस मिनिटांपर्यंत ताफा एका पुलावरच थांबून राहिला. शेवटी मोदी नाईलाजास्तव दौरा अर्धवट सोडून भटिंडा एअरपोर्टवर पोहोचले. दिल्लीला बसण्यापूर्वी त्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, त्यांच्यामुळे मी जीवंत परतलो अशा आशयाचं वक्तव्य केलं. ज्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. परिणामी पंतप्रधानांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचं लक्षात आलं. त्यावरुन काँग्रेस आणि भाजप तसच केंद्र आणि पंजाब सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप झाले. शेवटी प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.