…त्यापेक्षा घरी बसून होते तेच बरं होतं; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर भाजपची बोचरी टीका
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या तीन दिवसांपासून पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत आहेत. शनिवारी महाड येथील तळये गावाला भेट दिल्यानंतर रविवारी मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला भेट दिली. तेथील व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या, तसेच मदतीचे आश्वासनही दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा किंवा पॅकेज या पूरग्रस्त भागासाठा जाहीर केलं नाही. त्यावरुन भाजपने मुख्यमंत्र्यांचा दौरा काहीही उपयोगाचा नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री दौऱ्यावर जाऊन ना काही घोषणा करत आहेत, ना पीडितांना मदत करत आहेत. केवळ सरकारी यंत्रणांवर ताण वाढवत आहेत. त्यामुळे, ते घरी बसून पाहात होते तेच बरं होतं, असं म्हणायची वेळ आलीय. विशेष म्हणजे त्यांच्यासोबतचे आमदार उर्मट भाषेचा वापर करुन नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत, अशा शब्दात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२६ जुलै) रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले होते. मात्र, सातारा आणि कोयनानगर परिसरात जोरदार पाऊस आणि खराब हवामान यामुळे कोयनानगरातील हेलिपॅडवर ते लँड होऊ शकलं नाही. त्यामुळे हे हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे माघारी फिरावं लागलं.