
पणजी : लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पक्षाने दोन वेळा अध्यक्ष केले. मुख्यमंत्रीपद दिले. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. उमेदवारी नाकारली म्हणून त्यांनी पक्ष सोडणे दुर्दैवी आहे. आपल्याला तिकीट नाकारली म्हणून आपण पक्ष सोडला नाही असे भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंदशेट तानवडे यांनी सांगितले.
उत्पल पर्रीकर यांनीही थांबणे गरजेचे आहे. आपण विद्यमान आमदार असतानाही २०१२ साली आपणाला पक्षाने उमेदवारी नाकारली. तरीसुद्धा आपण पक्षात राहिलो. पक्ष सोडला नाही. भाजप नेते व कार्यकर्ते यांनी नेहमीच स्वतःच्या हितापेक्षा देशहिताला आणि पक्ष हिताला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पक्ष नेत्यांनी उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षापासून दूर न जाता पक्षासाठी काम करावे आणि पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन तानवडे यांनी केले.
यावेळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ व भाजपचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर उपस्थित होते. तानवडे म्हणाले, की भाजपाने पहिल्यांदाच गोव्यातील चाळीसही मतदारसंघात उमेदवार ठेवण्याचे ठरवले असून ३४ उमेदवार जाहीर केले आहेत.” इतर पक्ष स्वतः जिंकण्यासाठी लढत नसून फक्त ते भाजपला हरवण्यासाठी लढत आहेत. भाजपला हरवणे हा त्यांचा एकमेव अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
शाह, गडकरीही गोव्यात येणार
गोव्यात दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व गोवा प्रभारी सी. टी. रवी हे भाजप उमेदवारांसोबत चर्चा करणार आहेत. येत्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी या गोव्यात दाखल होऊन भाजपाच्या प्रचारात भाग घेणार आहेत, अशी माहिती तानवडे यांनी यावेळी दिली.
माजी मंत्री काँग्रेसचा हात सोडून घड्याळ हाती बांधणार?
गोव्यात बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. परंतु यानंतर अनेकांमध्ये नाराजीचा सूर असून काही नेत्यांनी उमेदवारी नाकारल्याने अन्य पक्षांचीही वाट धरली आहे. बाणावलीत काँग्रेसची उमेदवारी अँथनी डायस यांना जाहीर झाल्यानंतर आता माजी मंत्री मिकी पाशेको हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. पाशेको यांनी काँग्रेस पक्षाला गुडबाय करताना काँग्रेसने बाणावलीची उमेदवारी विकल्याचा थेट आरोप केला होता.
पाशेको हे बाणावलीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मागच्या वर्षी जुलै महिन्यात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे त्यांना वाटत होते. पाशेको यांच्याशी संपर्क साधला असता, आपण काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट होईल असे ते म्हणाले. उपलब्ध माहितीनुसार पाशेको हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रावादी काँग्रेसमधून त्यांना बाणावली किंवा नुवे मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदारसंघातून यापूर्वी पाशेको हे आमदार होते.
…तर पर्येत पर्यायी उमेदवार द्या; पी. चिदंबरम यांचे प्रतापसिंह राणेंना आवाहन
काँग्रेसने पर्येत याआधीच प्रतापसिंह राणे यांना उमेदवारी घोषित केली आहे. ते निवडणूक लढवणार नसतील तर त्यांनी पर्यायी उमेदवार द्यावा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत चिदंबरम् एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, पर्येतील उमेदवार एक- दोन दिवसात स्पष्ट होईल. काँग्रेसने ज्येष्ठ राणे यांना उमेदवारी जाहीर केली असली तरी ते निवडणूक लढवणार आहेत की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपने पर्येत त्यांची सून दिव्या राणे यांना तिकीट दिले आहे.
काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी अर्ज भरल्यानंतरच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासंदर्भात चर्चा होईल. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निवडणुकीआधी जाहीर करावा की निकालानंतर निवड करावी, हे ठरणार आहे. याबाबतीत काँग्रेस योग्य तोच निर्णय घेईल, असे ते म्हणाले.
तृणमूलने आमचे नेते पळविले
तृणमूलकडून येत्या निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव होता. परंतु, एकीकडे पक्षाने हा प्रस्ताव दिल्यानंतर दुसरीकडे कुडतरी, वास्को, मुरगावमध्ये तृणमूलने काँग्रेसचे नेते पळवले. हे योग्य नव्हे, असे चिदंबरम एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले.




