मार्क झुकरबर्गने ‘त्या’ ६ तासातच गमावले ४५,५५५ कोटी रुपये !

वॉशिंग्टन : फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने अवघ्या काही तासातच सहा अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास ४५ हजार ५५५ कोटी रुपये गमावले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात संपत्ती गमावल्याने त्याच्या जागतिक श्रीमंतांच्या यादीतील स्थानामध्येही घसरण झाली असून तो आता बिल गेट्स यांच्यानंतर पाचव्या स्थानी पोहोचला आहे. काल फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामचे जगभरातील सर्व्हर तब्बल सहा तासांसाठी डाऊन झाले होते. त्याचा फटका थेट फेसबुकला बसला असून फेसबुकचे शेअर्सही ४.९ टक्क्यांनी घसरले आहेत. फेसबुकच्या शेअर्समध्ये काल ४.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावधीपासूनचा विचार करता फेसबुकच्या शेअर्समध्ये एकूण १५ टक्क्यांची घसरण झाली आहे अशी माहिती ब्लूमबर्गने दिली आहे.
फेसबुकचे शेअर्स घसरल्याने मार्क झुकरबर्गच्या संपत्तीतही घट झाली आहे. त्याची एकूण संपत्ती आता १२१.६ बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. त्यामुळे तो आता बिल गेट्स यांच्या खाली पाचव्या स्थानावर ढकलला गेला आहे. एका आठवड्यापूर्वी मार्क झुकरबर्गची संपत्ती ही १४० अब्ज डॉलर्स इतकी होती असं ब्लूमबर्गने म्हटलं आहे.
फेसबुकचा विचार केला तर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हर स्लोडाऊन होता. २०१९ सालीही फेसबुकला अशा स्थितीचा सामना करावा लागला होता. कालच्या या घटनेनंतर फेसबुकचं मोठं नुकसान झालं असून कंपनीला अब्जावधी रुपयांचं नुकसान झालं आहे. या दरम्यान, स्लोडाऊनसाठी नेमकं काय कारण आहे याचा शोध कंपनीच्या वतीनं घेण्यात येत होता. या वर्षीच्या जुलै महिन्यात फेसबुकचे शेअर्स एक ट्रिलियन डॉलर्स इतक्या मार्केट कॅप व्हल्यूपर्यंत पोहोचलं होतं. आता त्याची किंमत घसरली असून ती ९२० अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.