पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील तमाम विरोधी पक्षाना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.या त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो,हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.परंतु अशाप्रकारची मोट बांधल्यानंतर स्थापन होणाऱ्या आघाडीचे नेतृत्व कोणाकडे असावे ? यावरून मतभेद होण्याची शक्यता आहे.या सर्व घडामोडी घडण्यापूर्वी गेल्या महिन्यात खा.संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे अकलेचे तारे तोडत संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना देण्यात यावे,असे पिल्लू सोडून दिले होते.त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच आगपाखड केली होती.कोणालाही विश्वासात न घेता केलेला हा मूर्खपणा त्यांच्या चांगलाच अंगलट आला होता.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केल्यानंतर खा.राऊत एकदम शांत झाले.आता ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो,हे पाहावे लागेल.ममता व पवार यांचे राजकारणात सौहार्दपूर्ण संबंध आहेत.पण काँग्रेससह अनेक पक्षांचा पवारांवर बिलकुल विश्वास नाही.काँग्रेसची सध्याची अवस्था बिकट असली तरी तो देशव्यापी पक्ष आहे.त्यामुळे नेतृत्वाची धुरा दुसऱ्या पक्षाकडे जाण्यास त्यांचा विरोध असेल.असे जर घडणार असेल तर नवीन आघाडी स्थापन करण्याऐवजी,संयुक्त पुरोगामी आघाडी अधिक मजबूत करणे योग्य ठरेल.एकत्रित आघाडीला प्रादेशिक नेतृत्व कधीच मान्य होणार नाही.त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला तरी ही आघाडी कितपत टिकेल,याबाबत साशंकताच आहे.भाजपला पर्याय निर्माण करण्यासाठी ममता यांचा हा आटापिटा असला तरी नेतृत्वाच्या प्रश्नावरून वादंग होण्याची शक्यता आहे.