Top Newsराजकारण

लखनऊमध्ये कन्हैय्या कुमार यांच्यावर शाईफेक

लखनऊ: विधानसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांच्यावर लखनऊमध्ये शाईफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार घडल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी शाई फेकणाऱ्यांना बेदम चोप दिला. मात्र, कन्हैय्या कुमार यांच्यावर शाई नाही तर, अ‍ॅसिड सदृष्य केमिकल फेकण्यात आल्याचा खळबळजनक दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

लखनऊमध्ये विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसची उमेदवार सदफ जाफरने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासाठी कन्हैया कुमार हे लखनऊमध्ये आले होते. उमेदवारी अर्ज दाखल करताना जमलेल्या कार्यकर्त्यांना कन्हैया यांनी मार्गदर्शन केले व मतदारांना आवाहन केले. हा कार्यक्रम सुरू असतानाच अज्ञात तरुणाने त्यांच्यावर शाई फेकल्याने एकच खळबळ उडाली. या तरुणाला उपस्थित कार्यकर्त्यांनी पकडले व बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. पोलीस अधिक चौकशी करत आहे.

अ‍ॅसिड सदृष्य केमिकल फेकण्याचा प्रयत्न

काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी या घटनेची माहिती देताना गंभीर आरोप केले आहेत. कन्हैया कुमार यांच्यावर शाई नाही तर अ‍ॅसिड सदृष्य केमिकल फेकण्याचा प्रयत्न झाला, असा मोठा दावा करण्यात आला आहे. कन्हैया यांच्या दिशेने हे केमिकल फेकले असता बाजूला असलेल्या आणखी तीन ते चार जणांवरही त्याचे थेंब उडाल्याचे सांगण्यात आले असून घटनास्थळावरचे पुरावे पोलिसांनी गोळा केले आहेत.

दरम्यान, लखनऊमध्ये येथून काँग्रेसने सदफ जाफर हिला तिकीट दिले आहे. सदफ ही अभिनेत्री असून, सामाजिक कार्यकर्ता म्हणूनही तिचे नाव आहे. लखनऊमध्येच तिचे घर असून, मीरा नायर यांच्या ए सुटेबल बॉय या चित्रपटात तिने भूमिका केली आहे. २०१९ मध्ये सीएए विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले होते. त्या आंदोलनात सदफ जाफर सहभागी झाली होती. लखनऊ पोलिसांनी तिला अटकही केली होती. नंतर तिची जामिनावर मुक्तता झाली होती.

लखनौमध्ये विधानसभेच्या एकूण ९ जागा आहेत. पण सर्वाचं लक्ष लखनौ मध्य विधानसभा मतदार संघाकडे लागून राहिलं आहे. कारण या मतदार संघावर नेहमीच भाजपाचं वर्चस्व राहिलं आहे आणि सलग ७ वेळा भाजपाचा उमेदवार निवडून येण्याचा विक्रम या मतदार संघाच्या नावावर आहे. २०१७ साली या मतदार संघातून योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री ब्रजेश पाठक निवडणुकीच्या रिंगणात होते. ब्रजेश पाठक यांनी सपाच्या रविदास मेहरोत्रा यांचा ५ हजाराहून अधिक मतांच्या फरकानं पराभव केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button