
मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अनलॉक झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह यंत्रणांकडून मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन झाले होते. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अत्यंत सावध भूमिकेत असून त्यांनी प्रशासनाला आक्रमक सूचना दिल्या आहेत. राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असे स्पष्ट आदेश उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांना दिल्या आहेत.
कोरोनाचे आव्हान संपलेलं नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला, कुठल्याही दबावाला बळी पडू नका असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक, जिल्हा प्रशासनाना दिला आहे. आपल्यासमोर करोनाचा संसर्ग राज्यभर सारखा नाही, त्याची तीव्रता कमी-जास्त आहे हे लक्षात घेऊन एकीकडे या विषाणूची साखळी तोडणे आणि दुसरीकडे आपले आर्थिक, सामाजिक दैनंदिन व्यवहार शिस्तबद्धरित्या सुरु कसे होतील हे पाहणे एवढ्याच करीता निर्बंधांच्या या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत. आपण स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे.
नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत. आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरु ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवायचे आहे. तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध राहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.




