
जळगाव : भाजपमध्ये ४० वर्षे हमाली केली. उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची घातलं. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलो आणि त्याचवेळी माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे आयोजित एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर खडसे बोलत होते. यावेळी खडसेंनी भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
मी टरबुज्या म्हणणार नाही, पण मी मुख्यमंत्रिपदापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर माझ्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस आणून ठेवला आणि मला मुख्यमंत्री पदापासून डावललं. मुख्यमंत्रिपदाचा अधिकार हा खान्देशाचा होता, स्वातंत्र्याला ७० वर्ष होऊन गेली, पण खान्देशावर अन्याय करण्यात आला, असेही खडसेंनी यावेळी सांगितलं.
आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना खडसे पुढे म्हणाले की, गेल्या ७० वर्षांत कोकणातून नारायण राणे, मनोहर जोशी यांच्यासह ३ मुख्यमंत्री झाले. त्याचप्रमाणे विदर्भातील ४ मुख्यमंत्री झाले आणि पाचवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाला. मराठवाड्यातील विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, शिवाजीराव निलंगेकर यांच्यासह चार मुख्यमंत्री झाले. परंतु, नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील एकही जण मुख्यमंत्री झाला नाही. उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रिपदावर अधिकार असतानाही एकदाही संधी देण्यात आली नाही. ४० वर्ष पक्षात आम्ही हमाली केली. पण अधिकार असतानाही आम्हाला मुख्यमंत्रिपदापासून डावलण्यात आलं. हा तुमचा अपमान असल्याची खंतही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखवली.