राजकारण

काँग्रेस नेते नितीन राऊत‌ यांचं ऊर्जामंत्री पद धोक्यात!

नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्री पद जाण्याची शक्यता

मुंबई : राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्री पद जाण्याची शक्यता आहे. दिल्लीत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारमध्ये राजकीय भूकंपाची मालिका सुरुच आहे. संजय राठोड यांचा राजीनामा, मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी झाल्यानंतर अजून एक मोठी घडामोड घडण्याची दाट शक्यता आहे. कारण ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याची माहिती मिळतेय. नितीन राऊत यांच्याकडील ऊर्जा खात्याची जबाबदारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्यमान ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचं महत्त्व कमी न करता खातेबदल होण्याचे संकेत पूर्वीपासूनच मिळत आहेत. फेब्रुवारीच्या सुरुवातीला नाना पटोले आणि नितीन राऊत एकाच वेळी काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले होते. राजधानी दिल्लीत झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी सूचक प्रतिक्रिया नाना पटोलेंनी त्यावेळी दिली होती. त्यामुळे नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात होते.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढीव वीज बिलाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात विज बील आलं. त्याविरोधात मनसे आणि भाजपनं राज्यभर आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांनी आपण राज्यातील जनतेला 100 युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर अद्यापही ठाम असल्याचं वक्तव्य 20 नोव्हेंबर 2020 रोजी केलं होतं. त्यावेळी आधी मागच्या सरकारच्या पापाचं निरसन करु, मगच 100 युनिट वीज माफ करण्याचा निर्णय घेऊ, असं राऊत म्हणाले होते. पण पुढे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 100 युनिट वीज बिल माफी देणार असं आपण सांगितलंच नव्हतं असं म्हटलं. 100 युनिट वीज बिल माफीबाबत एक समिती बनवली होती, असं आपण सांगितलं होतं. पण त्या समितीची बैठक झाली नाही म्हणून त्यात काहीच झालं नाही, असं राऊतांनी पुढे सांगितलं.

त्यामुळे या मुद्द्यावर भाजपने सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडली नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून काँग्रेसला अडचणीत आणण्यासाठी ऊर्जा खात्याला पैसा दिला जात नसल्याचा आरोपही भाजप नेत्यांनी केला होता. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. अनेक ठिकाणी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकण्यात आल. कुठल्याही परिस्थितील वीज बिल भरु नका, असं आवाहन भाजप नेत्यांकडून करण्यात आलं. या सर्व पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांची मोठी कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यामुळे हा प्रश्न हाताळताना नितीन राऊत कमी पडले, अशी राजकीय वर्तुळात चर्चाही सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता राऊत यांच्याकडील ऊर्जा खातं काढलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वीजबिलात सवलत द्या : नाना पटोले
लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव वीजबिलामुळे ग्राहक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सरकारने सवलत द्यावी, असे निर्देश नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदी असताना दिले होते. शासनाने घरगुती ग्राहकांना दिलासा द्यावा, असंही पटोले यांनी म्हटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button