समाजवादी कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी १९८९ मध्ये अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती फोडून पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. काम कमी आणि प्रसिद्धी जास्त या पद्धतीने काम करीत असताना डॉ. दाभोलकर यांची अंधश्रद्धा निर्मूलन कामासाठी पुण्यात हत्त्या झाली. त्याच महाराष्ट्र अंनिसमध्ये आजच्या घडीला तुफान भानगडी सुरू आहेत. नामांकित व्यक्तींना अध्यक्ष केल्यावर या कामासाठी मोठा निधी गोळा केला जातो. नंतर याच निधीवरून राजीनाराजी नाट्य सुरू होते. प्रख्यात नेते एन. डी. पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांना ज्या घाईने अध्यक्ष करण्यात आले त्यावरून अंनिसमध्ये दोन गट पडले आहेत.
श्रीमती सरोज पाटील यांना जसे एन. डी. यांच्या निधनानंतर तातडीने अध्यक्षपदी विराजमान करण्यात आले तसाच प्रयत्न दाभोलकर यांच्या हत्येनंतर झाला होता. या कार्यात काहीही संबंध नसणारे डॉ. हमीद आणि मुक्ता दाभोलकर-पटवर्धन या मुलांना वारस म्हणून महाराष्ट्र अंनिसमध्ये घुसवण्यात आले होते. डॉ. दाभोलकर यांनी आपल्या हयातीत ज्यांची राज्य कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती त्या अविनाश पाटील यांनी या सगळ्या प्रकाराला आक्षेप घेतला. श्रीमती सरोज पाटील यांची नियुक्ती करताना राज्य कार्यकारिणी बैठक न बोलावता हा प्रकार झाल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र अंनिस नावाचा जो स्वतंत्र ट्रस्ट तयार करण्यात आला त्याने अविनाश पाटील यांची राज्य कार्याध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याचे परवा जाहीर करून असंख्य कार्यकर्त्यांना झटका दिला आहे. गेली तीन दिवस सामाजिक क्षेत्रात यावरून मोठे काहूर माजले आहे. अंनिस ट्रस्टकडेे असणारा मोठा निधी कदाचित या वादाचा केंद्रबिंदू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात स्थापन झालेल्या या महाराष्ट्र अंनिसच्या अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्यक्ष फिल्डवर न जाता प्रसिद्धीचे विविध फंडे वापरत आजवर डॉ. दाभोलकर यांनी जे काम केले तेच प्रत्येकाला करायचे असते.
अनेकांना राज्यात आधीच दोन अंनिस काम करीत आहेत याचीच मुळात माहिती नाही. प्रा. श्याम मानव यांनी १९८२ साली नागपुरात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. तोवर डॉ. नरेंद्र दाभोलकर सातार्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये कमाई करीत होते. श्याम मानव यांनी नोकरी सोडून पूर्णवेळ हे काम सुरू केल्यावर विदर्भ, मराठवाड्यात झपाट्याने ही चळवळ फोफावली. त्यांना शेजारच्या राज्यातून या कार्यासाठी निमंत्रणे यायला लागल्यावर कुणीतरी चांगला सहकारी शोधण्याची गळ मानव यांनी डॉ.बाबा आढाव यांना घातली. त्यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव सुचवले. डॉ. दाभोलकर अशा गोल्डन संधीच्या शोधात होतेच. त्यांनी पुढे एक-दीड वर्ष श्याम मानव यांच्यासोबत काम करून चळवळ फोडली आणि याच नावाचा फायदा घेण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. या क्षेत्रात काम करणार्या ८० टक्के लोकांना सुद्धा हा इतिहास माहीत नाही. तो जाणीवपूर्वक सांगितला जात नाही असे म्हणणे त्यासाठी संयुक्तिक ठरेल. एवढ्या वर्षात महाराष्ट्र अंनिसने जे तत्त्वज्ञान, नाव, कार्यपद्धती वापरली ती मुळात श्याम मानव यांची मेहनत होती. मात्र, राज्यात माध्यमांना आपल्या बाजूने वळविण्याचे कसब त्यांच्याकडे नव्हते, परिणामी अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे डॉ. दाभोलकर हे समीकरण तयार करण्यात माध्यमातील सगळे समाजवादी आणि ब्राह्मण कामाला आले. जे दाभोलकर यांनी पेरले तेच आज उगवले आहे.