कल्याण: महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तिथली परिस्थिती लक्षात घेऊन नगरपंचायतीमध्ये काही ठिकाणी आघाडी झाली होती. वरती आघाडी आहे तर खाली आघाडी करण्यास काही हरकत नाही, असे विधान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिके निवडणुकीत आघाडीसाठी आम्ही तयार आहोत असे विधान केले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही आघाडीचे संकेत दिल्याने आगामी महापालिका निवडणूकीत शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीची संकेत मिळत आहे. मात्र काँग्रेसची भूमिका काय आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
श्री मलंगगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महेश गायकवाड यांनी मलंग गड पट्टय़ात क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास नगरसविकास मंत्री शिंदे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपरोक्त राजकीय संकेत दिले आहे. नगरसविकास मंत्री शिंदे यांनी सांगितले की, क्रिकेट सामन्यांचे शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र ग्रामीण भागातही चांगले क्रिकेट खेळणारे खेळाडू आहे. त्यांच्या खिलाडू वृत्तीला वाव देण्यासाठी प्रथमच मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत मोठय़ा संख्येने खेळाडू सहभागी झाले आहे. या स्पर्धेत राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू गेले पाहिजेत अशी पेक्षा शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.
या क्रिकेट सामन्यात ४० वर्ष वयोगटाच्या आत असलेल्या खेळाडूंचे ४८ संघ सहभागी झाले आहे. तर ४० वयोगटापेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूंचे १० क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला एक लाखाचे पारितोषिक दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
७ ते ८ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार; अपक्ष नगरसेवकाचा दावा
कल्याण-डोंबिवलीतील ७ ते ८ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. मीही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असा दावा अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासमोरच पाटील यांनी हा दावा केला आहे. पाटील यांच्या दाव्यामुळे कोणत्या पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागणार याबाबतची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग सुरू झालेली असतानाच आता राष्ट्रवादीतही आता इनकमिंग सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात कल्याण-डोंबिवलीतील राजकीय हवा अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. कल्याणमध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, वंडार पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यकर्त्यांचा मेळावा आज दोन ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यकर्ता मेळाव्याला अपक्ष नगरसेवक कुणाल पाटीलही उपस्थित होते. यावेळी त्यांनी हा दावा केला आहे. २०१५ मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कुणाल पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र आज राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात कुणाल पाटील हे त्यांच्या समर्थकांसह उपस्थित राहिले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मी आणि माझ्यासोबत सात ते आठ नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असं त्यांनी यावेळी जाहीर केलं. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये कुणाचा प्रवेश होणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना जोरदार मार्गदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. लोकांनी काय पेहराव करावा यासाठी आता केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग या नावाने मंत्रालय सुरू करावे. म्हणजे त्यामुळे प्रश्न मिटतील, असा टोला आव्हाड यांनी भाजपला हिजाबवरुन सुरु असलेल्या वादावर टोला लगावला आहे.
इतकेच नाही तर केडीएमसी निवडणुकीत आम्ही आघाडी करायला तयार आहोत. मात्र त्यांच्या मनात काय सुरू आहे हे ओळखायला मी काही ज्योतिषी नाही, असा चिमटा शिवसेना नेत्यांना काढला. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे निर्देशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.
कल्याण-डोंबिवलीत अनेक वर्षापासून शिवसेना-भाजपची सत्ता होती. त्यामुळे आव्हाड यांना विकासाच्या मुद्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, कल्याण-डोंबिवलीत विकास हरवला आहे. तो फक्त विकास म्हात्रे यांच्या घरीच झाला आहे अशी टीका आव्हाड यांनी करताच एकच खसखस पिकली.