Top Newsराजकारण

अजितदादांच्या कार्यक्रमातील गर्दी राष्ट्रवादीला भोवणार, पुणे शहराध्यक्षांसह सुमारे १५० कार्यकर्त्यांवर गुन्हे

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आता ही गर्दी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सुमारे १५० दिडशे कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी ठरु शकते. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानंतर जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्यालयाच्या उदघाटनाला कार्यकर्त्यांची झालेली गर्दी कोरोना नियमांची पायमल्ली करणारी होती. अजित पवारांच्या उपस्थितीत ही गर्दी झाल्यामुळे भाजप नेते त्यावर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. सर्वसामान्य नागरिकांमध्ये चुकीचा संदेश गेलाय. ही गर्दी अजितदादांच्या इमेजला धक्का देणारी ठरलीय. त्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, संयोजकांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलीय. दरम्यान, अजित पवार यांनी कालच्या गर्दीबाबत दिलगिरी व्यक्त केलीय. अशा पद्धतीनं गर्दी करायला नको होती, असं अजितदादा म्हणालेत.

मला प्रशांतने १० तारखेला सांगितलं होतं की या कार्यक्रमाला भेट द्या, माझ्या स्वत:च्या मनामध्ये होतं की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कार्यालयाचं उद्घाटन करावं. पण सध्याचं एकंदरीत वातावरण, नियम, लोकांची उपस्थिती पाहता तसं केलं नाही. आम्ही लोकांची गर्दी होईल म्हणून सकाळी ७ वाजतादेखील उड्डाणपुलांचे उद्घाटन केलेली आहेत. अगदी तसंच सकाळी सातला उद्घाटन केलं असतं तर कार्यक्रमाला लोकं मर्यादित आली असती, असा दावा अजित पवार यांनी केला.

गाडीत असताना उद्घाटन न करता निघून जावं असा विचार आला. मात्र कार्यकर्ते नाराज झाले असते. लोकांमध्येही नाराजी दिसली असती. मी प्रसादला सांगितलं होतं की अतिशय साधेपणाने, नियमांचं तंतोतंत पालन करुन आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही जनतेला आवाहन करतो की, आपण नियमांचं पालन करा आणि मलाच एका कार्यक्रमात बोलवलं जात आणि इतक्या अडचणीत टाकलं जातं की धड धरताही येत नाही आणि सोडताही येत नाही. अशी माझी अवस्था झाली आहे. त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं अजित पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button