टोक्यो : भारताचा टोक्यो ऑलिम्पिकमधील शेवट गोड झाला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याने शेवट गोड झाला आहे. यामुळे भारताला तब्बल १३ वर्षानंतर वैयक्तिक सुवर्णपदक मिळालं आहे. याआधी २००८ च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने भारताला पहिलवहिलं सुवर्ण मिळवून दिलं होतं. दरम्यान यंदाच्या या टोकियो ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने पर्यायाने खेळाडूंनी पराक्रम रचला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत पहिल्यांदा सर्वाधिक मेडल्सची कमाई करण्याचा कारनामा केला आहे.
भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये एकूण ७ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्यपदकांचा समावेश आहे. यामध्ये ६ वैयक्तिक तर १ सांघिक पदकाचा समावेश आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक मिळवलंय. याआधी भारताने २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये ६ पदकांची कमाई केली होती. पण यामध्ये केवळ रौप्य आणि कांस्य पदकांचाच समावेश होता. मात्र यावेळेस भारताने नवा पराक्रम रचला आहे. यंदा भारताने पहिल्या तिन्ही क्रमांकाची पदक पटकावली आहेत.
पदक मिळविणारे गुणवंत :
नीरज चोप्रा : भालाफेक – सुवर्णपदक
मीराबाई चानू : वेटलिफ्टिंग- रौप्यपदक
रवीकुमार दहीया : कुस्ती – रौप्यपदक
बजरंग पुनिया : कुस्ती – कांस्यपदक
पी व्ही सिंधू : बॅडमिंटन – कांस्य पदक
लव्हलिना बोरगोई : बॉक्सिंग – कांस्यपदक
भारत पुरुष हॉकी संघ : कांस्यपदक