
मुंबई : संयुक्त अरब अमिराती (यूएई) त होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात कोणाला धी मिळतेय याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आतापर्यंत न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानने आपापला संघ जाहीर केला. पण, सर्वांना प्रतीक्षा होती ती टीम इंडियाच्या घोषणेची. टीम इंडियाच्या निवड समितीनं आज कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप साठीचा संघ निश्चित केला.
कोरोना नियमांमुळे आयसीसीनं खेळाडूंची संख्या २३ वरून ३० इतकी नेण्यास मान्यता दिली आहे. यात सपोर्ट स्टाफचाही समावेश असणार आहे. संघ ३० पेक्षा अधिक जणांचा ताफा घेऊन जाऊ शकतो, परंतु त्याचा खर्च त्या त्या क्रिकेट संघटनेला करावा लागणार आहे. आर. अश्विन या संघातील सप्राईज पॅकेज ठरला. माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी या संघाला मेंटर असणार आहे, युझवेंद्र चहलला डच्चू मिळाला आहे. भारतीय फलंदाजांचा नेहमीसारखाच तगडा ताफा टी ट्वेन्टी वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलाय. तितक्याच तोडीस तोड गोलंदाजीचं आक्रमण देखील असणार आहे.
भारताच्या संघात चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असणार आहेत. २०१७ मध्ये आर अश्विन टीम इंडियाकडून अखेरचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता आणि आता तो थेट वर्ल्ड कप खेळणार आहे.
फिरकी गोलंदाजीची जबाबदारी ही अश्विन, जाडेजा, अक्षर पटेल आणि राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांच्या खांद्यावर असणार आहे. फलंदाजी ही जाडेजा, अश्विन आणि राहुल चहर यांची जमेची बाजू आहे. गेल्या काही महिन्यांपासून रविंद्र जाडेजा अष्टपैलू कामगिरी करत आहेत. त्यामुळे जाडेजाकडून टीम इंडियाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. जाडेजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीत साऊथम्पटनमध्ये 1 सामना खेळला आहे. त्यामध्ये जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर इंग्लंड दौऱ्यातही जाडेजाने महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. जाडेजाची ही कामगिरी टीम इंडियासाठी आशादायक आहे. दुसरीकडे अश्विनचं चार वर्षानंतर टी ट्वेन्टीमध्ये पुनरागमन झालं आहे. परंतु त्याच्याकडे अनुभवाचा कोष आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय सामने खेळतो आहे. तसंच तो याअगोदर वर्ल्डकपमध्येही खेळलेला आहे. त्यामुळे जाडेजाच्या साथीला अश्विनची खंबीर साथ असणार आहे.
अश्विन जाडेजाच्या जोडीला अक्षर पटेल, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती यांचीही साथ असणार आहे. राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती या फिरकीपटूंना पहिल्यांदाच वर्ल्कप खेळण्याची संधी मिळाली आहे.
दुसरीकडे वेगवान गोलंदाजीमध्ये भारताकडे जास्त पर्याय उपलब्ध नाहीत. पण ज्यांचा संघात समावेश केलाय ते प्रतिस्पर्ध्यांची दांडी गुल करण्यास कधीही सज्ज आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांच्यावर वेगवान आक्रमणाचा भार असणार आहे. तिन्ही गोलंदाज इनस्विंग आणि आऊटस्विंग करण्यास माहिर आहेत. तर तिघेही अतिशय उत्तम यॉर्कर टाकू शकतात, ही त्यांची तगडी बाजू आहे.
आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) , रोहित शर्मा (उप कर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर
भारतीय संघाचे वेळापत्रक
२४ ऑक्टोबर – भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३१ ऑक्टोबर – भारत वि. न्यूझीलंड, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
३ नोव्हेंबर – भारत वि, अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
५ नोव्हेंबर – भारत वि. ब गटातील अव्वल, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता
८ नोव्हेंबर – भारत वि. अ गटातील उपविजेता, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता
उपांत्य फेरीचे सामने -१० नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर
अंतिम सामना – १४ नोव्हेंबर
पाकिस्तानचा संघ – बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी
ऑस्ट्रेलियाचा संघ – अॅरोन फिंच ( कर्णधार), अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा
न्यूझीलंडचा संघ – केन विलियम्सन ( कर्णधार), मार्टिन गुप्तील, डेव्हन कॉनव्हे, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, टीम सेईफर्ट, मिचेल सँटनर, ईश सोढी, ग्लेन फिलिप्स, जिमी निशॅम, डेरिल मिचेल, कायले जेमिन्सन, लॉकी फर्ग्युसन, मार्क चॅपमॅन, टॉम अॅस्टल. राखीव खेळाडू – अॅडम मिल्ने




