
दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात दमदार पुनरागमन केलं. त्यानंतर आरसीबीच्या फलंदाजांकडूनही दमदार खेळ झाला. आर श्रीकर व ग्लेन मॅक्सवेल यांनी राजस्थानच्या गोलंदाजांना बदडले व संघाला विजय मिळवून देताना प्ले ऑफच्या दिशेनं मजबूत पाऊल टाकले. यंदाच्या आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाने आज पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत राजस्थान रॉयल्स संघाला ७ विकेट्सनी मात दिली आहे. स्पर्धेतील ४३ वा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवण्यात आला. ज्यामध्ये विराटच्या संघाने संयमी उत्कृष्ट खेळ दाखवत सामना ७ गडी आणि १२ चेंडू राखून जिंकला.
सामन्यात आधी नाणेफेक जिंकत विराटने गोलंदाजी घेतली. आपल्या या निर्णयाला पूर्णपणे बरोबर सिद्ध करत विराटसेनेने राजस्थान संघाला १४९ धावांवर रोखलं. केवळ लुईसच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान किमान आव्हानात्मक धावसंख्या स्कोरबोर्डवर लावू शकली. पण आरसीबीकडून मात्र भरतने ४४ आणि मॅक्सवेलने नाबाद ५० धावा ठोकत संघाला सोपा विजय मिळवून दिला.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानच्या फलंदाजानी सुमार कामगिरी केली. सलामीवीर एविन लुईसने अप्रतिम अर्धशतक झळकावलं. त्याने ३७ चेंडूत ५८ धावा केल्या. त्याला यशस्वीने देखील ३१ धावांचं योगदान दिलं. पण ७७ धावांवर यशस्वीचा विकेट पडल्यानंतर मात्र राजस्थानची फलंदाजी ढासळू लागली. १०० धावांवर लुईस बाद होताच, त्यानंतर एक एक गडी तंबूत परतू लागले. संजू सॅमसन (१९) आणि ख्रिस मॉरीस (१४) यांना सोडता एकाही फलंजदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे राजस्थानने केवळ १४९ रन केले. यावेळी आरसीबीच्या गोलंदाजांनी १० ओव्हरनंतर दमदार गोलंदाजी केल्यामुळे अशाप्रकारे राजस्थानचे फलंदाज बाद झाले. यावेळी हर्षलने एका षटकात ३ विकेट घेतल्या. तर चहल आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर ख्रिस्टियन आणि गार्टन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
आरसीबीची फलंदाजी येताच सलामीवीर विराट आणि देवदत्त यांनी विश्वासू फलंदाजी करण्यास सुरुवात केली. पण संघाच्या ४८ धावा झाल्या असताना देवदत्त २२ धावा करुन बाद झाला. त्यानंतरही भरत आणि विराटने डाव सांभाळला. पण २५ धावा करुन विराटही बाद झाला. त्यानंतर भरतच्या ४४ धावांमुळे आरसीबीचा डाव सावरला. पण मॅक्सवेलने ३० चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५० धावा केल्या. ज्यामुळे सामना पूर्णपणे आरसीबीच्या पारड्यात झुकला. मॅक्सवेलच्या अर्धशतकानंतर डिव्हिलीयर्सने १८ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावत सामना ७ गडी आणि १२ चेंडू राखून जिंकवून दिला.