भारतीय नागरिकांना ४ मेपासून अमेरिकेत ‘नो एन्ट्री’

नवी दिल्ली: भारतात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. देशभरात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत लाखोंनी वाढ होत आहे. तर दिवसाला हजारोच्या संख्येने कोरोनोबाधितांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळेच भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने ४ मेपासून भारतीयांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे. व्हाईट हाऊसने एका निवेदनात याबाबत माहिती दिली.
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, रोग नियंत्रण आणि आटोक्यात आणण्यासाठीच्या यंत्रणांच्या सल्ल्यानुसार प्रशासनाकडून भारतातून होणाऱ्या प्रवासावर बंदी आणण्यात येत आहे. भारतातील कोविड १९ चा वाढता प्रसार आणि कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या प्रसारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या मदतीसाठी जगभरातील अनेक देशांनी आणि मोठ्या कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह जगातील सुमारे ४० देश भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यापैकी अनेक देशांनी वैद्यकीय मदत पाठवली आहे.




