ओव्हल : पहिल्या डावात पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात चांगलीच मुसंडी मारली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या (१२७) शतकी आणि चेतेश्वर पुजाराच्या (६१) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद २७० धावांपर्यंत मजल मारली आहे. अंधुक प्रकाशामुळे आजच्या दिवसाचा उर्वरित ४० मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने २७० धावांपर्यंत मजल मारल्यामुळे भारताला १७१ धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली (२२) आणि रवींद्र जाडेजा (९) नाबाद आहेत.
दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने ८३ धावांची सलामी दिली. ४६ धावांवर असताना लोकेश राहुल जेम्स अँडरसनची शिकार ठरला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराने दिडशतकी भागीदारी करत भारताला आघाडी मिळवून दिली. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी दुसऱ्या विकेटसाठी २७८ चेंडूंत १५३ धावांची भागीदारी करताना विक्रम केला. रोहितने आज त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं ८ वं आणि परदेशातलं पहिलं शतक ठोकलं. त्याने १२७ धावांची खेळी केली. पुजाराने ६१ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. ऑली रॉबिन्सनने एकाच षटकात या दोघांनाही बाद करत इंग्लंडला ब्रेकथ्रू मिळवू दिला. नवा चेंडू हाती घेऊन ऑली रॉबिन्सननं सामन्यातील ८१ वे षटक फेकण्यासाठी रन अप घेतले, त्यानं टाकलेला शॉर्ट चेंडू सीमापार पाठवण्यासाठी रोहितनं पुल शॉट खेळला, ख्रिस वोक्स फाईन लेगवरून धावत सुटला अन् रोहितचा झेल टिपला. २५६ चेंडूंत १४ चौकार व १ षटकार खेचणारा रोहित १२७ धावांवर माघारी परतला. याच षटकाच्या सहाव्या चेंडूवर रॉबिन्सन यानं पुजाराला बाद केले. इनस्वींग झालेला चेंडू पुजाराच्या बॅटची कड घेत मांडीवर आदळून स्लीपमध्ये उभ्या असलेल्या मोईन अलीच्या हाती झेपावला. त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाने विकेट जाऊ दिली नाही.
रोहितचं परदेशातले पहिले कसोटी शतक
इंग्लंड दौऱ्यावर भारताचे इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, तर रोहित शर्मा वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने लॉर्ड्स आणि हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी साकारल्या आणि अर्धशतके केली होती, पण तो त्या अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करू शकला नाही. रोहितने ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. ६४ व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले.
पुजाराचीही फटकेबाजी
चेतेश्वर पुजारा धिम्या गतीने धावा जमवतो, त्याच्या स्ट्राईक रेटवरुन त्याला नेहमीच ट्रोल केलं जातं. अनेकद्या त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीकादेखील होते. मात्र आजच्या डावात पुजारा वेगळ्याच फॉर्ममध्ये होता. त्याने १२७ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ६१ धावांची खेळी केली. त्याने रोहितसोबत दिडशतकी भागीदारी केली. पुजाराने आज काही आक्रम फटकेदेखील लगावले. पुजारासोबत लोकेश राहुलनेदेखील चांगली सुरुवात करुन दिली. त्याला त्याचं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. मात्र त्याने रोहित शर्मासोबत ८३ धावांची भागीदारी केली. वैयक्तिक ४६ धावांवर तो बाद झाला.
रोहित-लोकेश जोडीनं मोडला ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम
रोहित शर्मा व लोकेश राहुल या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला. लोकेश व रोहित यांनी यावेळी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांमध्ये दुसरे स्थान पटकावले. लोकेश व रोहित यांनी या मालिकेत ३६७* धावांची भागीदारी केली आहे. इंग्लंडमध्ये सर्वात यशस्वी भारतीय सलामीवीरांमध्ये सुनील गावस्कर व चेतन चौहान ही जोडी आघाडीवर आहे. त्यांनी १९७९च्या मालिकेत ४५३ धावा जोडल्या होत्या. रोहित व लोकेश यांनी ८५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १९३६मध्ये विजय मर्चंट व सय्यद मुश्ताक अली यांनी ३६६ धावा जोडल्या होत्या.
रोहित शर्माच्या सलामीवीर म्हणून ११ हजार आंतरराष्ट्रीय धावा
रोहितनं तिसऱ्या दिवशी २६वी धाव काढून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ११ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे. सचिनंतर (२४१ डाव) सर्वात कमी २४६ डावांमध्ये रोहितनं ही कामगिरी केली आहे. सध्या खेळत असलेल्या सलामीवीरांमध्ये सर्वाधिक धावा ख्रिस गेलच्या (१८८४७) नावावर आहेत. त्यानंतर डेव्डिड वॉर्नर (१४८०३), तमिम इक्बाल (१४१७३), रोहित (११०००*), मार्टीन गुप्तील ( १०९७६) व शिखर धवन (१०१७८) असा क्रमांक येतो.