Top Newsराजकारण

किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये केली भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी

नाशिक: किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला १२ वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं. त्यांनी हसून उत्तर देणं टाळलं. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतील ‘त्या’ नऊ मजली इमारतीशी भुजबळांचा संबंध काय?

मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची ९ मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इथे एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना ९ मजली इमारत कशी दिली?, ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल करतानाच परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा सोमय्या यांनी केला. तसेच येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आर्मस्ट्राँ इन्फ्रा, आर्मस्ट्राँ एनर्जीने मालेगावमधली गिरणा शुगर मिल विकत घेतली. गिरणा शुगर मिल ही भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे. त्यांनी भुजबळाच्या इमारतीचे मालक कोण? हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं.

छगन भुजबळ यांनी नामी आणि बेनामी मालमत्ता जाहीर करावी. गेल्या आठवड्यात त्यांची १३० कोटींची बेनामी संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे. त्यावर भुजबळांकडून अजून उत्तर आलेलं नाही, असं सोमय्या म्हणाले.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळींवरही आणखी एक गंभीर आरोप केला. एका ट्रस्टचे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रूपांतर करून 70 कोटी रुपयांची मालमत्ता आपल्या पीएच्या नावावर करण्यात आली. या ट्रस्टची महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रुपांतर करताना बोगस कागदपत्रे वापरण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असं सोमय्या म्हणाले.

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही प्रतिक्रिया दिली. परब यांच्याविरोधात मी पहिली तक्रार दिली होती. त्याची सुनावणी सुरू आहे. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवलं. आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले.

यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जुन्या गोष्टीचं स्मरण करून दिलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असताना ईडीने केलेल्या कारवाईचं कौतुक केलं होतं. मग आता भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता?, असा सवाल त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button