पाटणा/लखनऊ : बिहारमध्ये दोन पोटनिवडणुकांच्या प्रचाराच्या काळातच राष्ट्रीय जनता दल व काँग्रेस यांची महाआघाडी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. हे दोन्ही पक्ष वेगळे झाले असून, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सर्व ४० जागांवर आमचे उमेदवार असतील, अशी घोषणा बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनी केली आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेस, सपा आणि रालोद एकत्रित रणनीती तयार करत आहेत.
बिहारमध्ये महाआघाडी फुटण्यास राजदच जबाबदार असल्याचा आरोपही दास यांनी केला. ते म्हणाले की, ज्या दोन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत, त्यापैकी कुशेश्वरस्थान हा आमचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यामुळे राजदने ती जागा सोडावी, अशी विनंती आम्ही केली. पण राजदने ती अमान्य केल्याने आणि दोन्ही जागांवर उमेदवार उभे केल्याने आम्हालाही तसाच निर्णय घ्यावा लागला.
उत्तर प्रदेशात आघाडीबाबत चर्चा
उत्तर प्रदेशात सध्या रालोद आणि सपाची आघाडी आहे. रालोद नेते जयंत चौधरी यांच्याशी काँग्रेस संपर्कात आहे. दिल्लीहून लखनौला विमानातून जाताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यात आगामी निवडणुकीबाबत दीर्घ चर्चा झाली. त्यामुळे सपा, काँग्रेस आणि रालोदच्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या लखनौ मुक्कामी असून पूर्व उत्तर प्रदेशात किमान शंभर जागांवर मजबूत उमेदवार उतरविण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. महिलांना ४० टक्के तिकिटे देण्याची घोषणा करतानाच विद्यार्थिनींना मोबाइल आणि स्कूटी देण्याचे आश्वासन दिले आहे.
प्रियंका गांधी यांच्या निर्देशावरून पंजाब आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने लखीमपूरमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी आणि पत्रकार यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देऊन काँग्रेसने हे सिद्ध केले आहे की, काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत उभा आहे.