
लीड्स : हेडिंग्ले मैदानात पहिला डाव सर्वबाद ७८ धावांवर आटोपल्यावर भारताच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात पलटवार केला आहे. रोहित शर्मा (५९ धावा) , चेतेश्वर पुजारा नाबाद ९१ आणि विराट कोहली नाबाद ४५ धावा यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा ८० षटकांत २ बाद २१५ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर आटोपला. त्यानंतर दिवसाअखेर भारत इंग्लंडपेक्षा १३९ धावांनी मागे आहे.
भारतीय फलंदाजांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. पुजाराने आपल्या ९१ धावांच्या खेळीत तब्बल १५ चौकार लगावले. त्याने २२ व्या आणि २५ व्या षटकांत अँडरसनला तर २४ व्या षटकांत ओव्हरटनला चौकार लगावत जणू काही आज त्याचाच दिवस असल्याचे संकेत दिले. त्यानंतर त्याने २९ व्या षटकात पुन्हा दोन चौकार लगावले. त्याने ५१ व्या षटकांत ओव्हरटनला चौकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो शतकाच्या दिशने आणि कर्णधार विराट कोहली अर्धशतकाच्या दिशेने जात असतांनाच अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला.
लिड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवलेलं पाहायला मिळालं. कोणतीच घाई न करता संयमानं खेळ करत भारतीय संघानी इंग्लंडला उत्तर दिले आहे. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून भारताच्या धावसंख्येत भर घातली. रोहित शर्माला अम्पायरच्या चुकीमुळे माघारी जावं लागलं, परंतु पुजारानं एक बाजू खिंड लढवत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.
दुसऱ्या डावात रोहित व लोकेशनं आश्वासक सुरुवात करत काही सुरेख फटके मारले. लोकेशला अम्पायरनं पायचीत बाद दिले होते, पंरतु त्यानं लगेच रिव्ह्यू घेतला आणि त्यामुळे तो वाचला. पण, त्याचा फायदा उचलण्यात तो अपयशी ठरला. लंच ब्रेक होण्यापूर्वीच्या षटकात लोकेश ८ धावांवर माघारी परतला. रोहित व चेतश्वर पुजारा या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी १७३ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून टीम इंडियाचा डाव सावरला. रोहितनं २०२१मधील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पण, ४८व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहितसाठी पायचीतचे अपील झाले, मैदानावरील पंचांनी त्याला बाद दिले. याविरोधात हिटमॅननं डीआरएस घेतला. त्यात चेंडू यष्टिंना चुकवून जात असल्याचे दिसत होते. फक्त अम्पायर्स कॉलमुळे रोहितला बाद ठरवण्यात आले. रोहित १५६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ५९ धावांवर माघारी परतला.
चेतेश्वर पुजाराचा परतलेला फॉर्म हा टीम इंडियासाठी आजच्या दिवसाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला. कर्णधार विराट कोहलीनंही संयमी खेळ करताना पुजाराला उत्तम साथ दिली. या दोघांनी उगाच बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न केला नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या २ बाद २१५ धावा झाल्या आहेत. विराट ९४ चेंडूंत ६ चौकारांसह ४५ धावांवर, तर पुजारा १८० चेंडूंत १५ चौकारांसह ९१ धावांवर खेळत आहे.
भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गडगल्यानतंर इंग्लंडचे सलामीवीर हसीब हमीद ( ६८) आणि रोरी बर्न्स ( ६१) यांनी १३५ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात करून दिली. कर्णधार जो रूटनं पुन्हा एकदा दमदार खेळ केला. त्यानं डेविड मलानसह ( ७०) १३९ धावांची भागीदारी केली. रूट १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक चार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज व रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
– भारत (पहिला डाव) : ४०.४ षटकांत सर्वबाद ७८ धावा.
– इंग्लंड (पहिला डाव) : १३२.२ षटकांत सर्व बाद ४३२ धावा (जो रुट १२१, डेव्हिड मलान ७०, हसीब हमीद ६८, रोरी बर्न्स ६१; मोहम्मद शमी ४/९५, जसप्रीत बुमराह २/५९, मोहम्मद सिराज २/८६, रवींद्र जडेजा २/८८.)
– भारत (दुसरा डाव) : ८० षटकांत २ बाद २१५ धावा (रोहित शर्मा ५९, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ९१, विराट कोहली खेळत आहे ४५; क्रेग ओव्हरटन १/१८, ओली रॉबिन्सन १/४०.)




