Top Newsराजकारण

भाजपचा २०२४ मध्ये पराभव करायचाय, मग हे करा…; प्रशांत किशोर यांनी उघड केली रणनीती

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या संभाव्यतेबद्दल आपले मत उघडपणे मांडले आहे. भाजपनं हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि लोककल्याणकारी धोरणांचे भक्कम आख्यान तयार केलं आहे. विरोधी पक्षांना यापैकी किमान दोन आघाड्यांवर भाजपला मात द्यावी लागेल, असं ते यावेळी म्हणाले. दरम्यान, २०२४ मध्ये भाजपला पराभूत करू शकणारी अशी विरोधी आघाडी उभारण्यास मदत करू इच्छित असल्याचेही त्यांनी सांगितलं.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करणे शक्य आहे. मात्र विरोधकांच्या सध्याच्या परिस्थितीनुसार भाजपला पराभूत करणं कदाचित शक्य नाही. मला अशी विरोधी आघाडी तयार करायची आहे, जी २०२४ मध्ये भाजपला जोरदार टक्कर देऊ शकेल, असं प्रशांत किशोर यावेळी म्हणाले. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी बोलताना लोकसभेच्या २०० जागांचा उल्लेख केला, ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांच्या थेट टक्क होणार आहे. या ठिकाणी गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं ९५ जागा मिळवल्या आहे, तसंच त्या १९५ मध्ये बदलू शकतात. ज्या पक्षाला भाजपचा पराभव करायचा असेल त्यांना कमीतकमी ५ ते १० वर्षांची रणनीती तयार करावी लागेल. हे पाच महिन्यांत होणं अशक्य आहे, असंही ते म्हणाले.

प्रशांत किशोर आणि काँग्रेसनं एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असं इतरांना वाटणं स्वाभाविक आहे. परंतु दोन्ही बाजूंनी एकमेकांवर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकायला हवं. परंतु काँग्रेससोबत तसं झालं नाही, असं प्रशांत किशोर म्हणाले. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसमध्ये व्यापक बदल होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसला एक विचार म्हणून कमकुवत होताना पाहिलं जाऊ शकत नाही. त्यांचं बळकट होणं हे लोकशाहीच्या हिताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. बंगालच्या निवडणुकांनंतर पक्षाच्या विस्तारासाठी तृणमूल काँग्रेस आणि इंडियन पॉलिटिकल अ‍ॅक्शन कमिटीदरम्यान सहमती झाली. यात काही गोष्टींसाठी जेव्हा माझी त्यांना गरज असते मी उपस्थित असतो, असं त्यांनी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात तृणमूलमध्ये जात असलेल्या नेत्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button