राजकारण

तिसरी लाट येणार नसेल, तर गरब्याला परवानगी द्या; भाजपची मागणी

मुंबई : मुंबईत झालेल्या लसीकरणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणे शक्य नसल्याचे मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून मान्य केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करत मुंबईत गरब्यावर घालण्यात आलेली बंदी मागे घेत घटस्थापनेपासून सुरु होणाऱ्या गरब्याला कोरोनाच्या नियमावलीसह परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

कोरोनाचे कारण पुढे करत हिंदू सणांवर बंदी घालण्याचे सत्रच महाविकास आघाडी सरकारने सुरु केले आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी सुद्धा कोरोनाचे कारण पुढे करण्यात आले होते. हिंदू सणाच्या निमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल होत असते, मात्र मागील वर्षभराच्या काळात हिंदू सणांवर घालण्यात आलेल्या बंदी मुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. परंतू मुंबई महानगरपालिकेनेच आता तिसरी येणार नसल्याचे स्वतःच मान्य केले आहे. त्यामुळे घटस्थापनेपासून सुरु होणाऱ्या गरब्यासह आगामी काळात येणारे सर्वहिंदू सण सार्वजनिकरित्या साजरे करण्यास परवानगी द्यावी.

महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?

मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले, परंतु मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे.

मागील वर्षभराच्या काळात राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 42 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करून राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेटचा भांडाफोड करण्यात आला, किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती.

परवा एनसीबी कडून टाकण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खान सह अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून मोठ्या अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. इतकेच नव्हे तर मागील दोन वर्षांपासून हे सर्व युवक अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे उघड झाले आहे. मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे, अशी टीका भातखळकर यांनी केलीय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button