नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. छगन भुजबळ यांना पालकमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुहास कांदे यांनी केला. दरम्यान, छगन भुजबळ यांनीही सुहास कांदे यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
भुजबळ यांनीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी नांदगावला ४५ कोटी निधी दिला. या वर्षीचा निधी कोरोनासाठी वापरा हे सरकारचे निर्देश होते. निधी वाटप हा निर्णय जिल्हाधिकारी समितीने घेतला आहे. मी निधी वाटतो हा सुहास कांदे यांचा आरोप चुकीचा आहे. पालकमंत्री म्हणून सगळ्यांना समान वाटप करणे हे माझे काम आहे. यावरून हायकोर्टात जाणे योग्य नाही. मुख्यमंत्री हे शिवसेनेचे आहेत, हे त्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना पटले तर ते पालकमंत्री बदलतील, असे भुजबळ म्हणाले.
याचबरोबर, असे आरोप महाविकास आघाडी असताना करणे योग्य नाही. मी सुहास कांदे यांना सहकार्य करणार. मी कोणालाही धमकी देत नाही मात्र विनंती जरूर करतो. हा भुजबळ विरुद्ध शिवसेना संघर्ष नाही. सुहास कांदे शिवसेनेचे म्हणून शिवसेना नेते त्यांच्यासोबत असावेत. निवडणूक आली की वेगवेगळे पक्ष युती करतात. प्रत्येक पक्ष आपआपल्या पद्धतीने प्रयत्न करणार आणि शेवटी जनता ठरवेल कोण योग्य, असे भुजबळ यांनी सांगितले. तसेच, बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्याचा राग त्यांच्या कुटुंबीयांना राहिला नाही, यांनाच का? असा सवालही करत माझ्याकडून या विषयाला पूर्णविराम दिला आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.