Top Newsराजकारण

भाजप नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल: संजय राऊत

नवी दिल्ली: चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत. निरागस आहेत. पण त्यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या चष्म्याचा नंबर चेक करावा लागेल, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना हा टोला लगावला. देशात फक्त महाराष्ट्र राज्य व्यवस्थित आहे. चंद्रकांत पाटील आणि अन्य भाजप नेत्यांच्या चष्माचा नंबर चेक करावा लागेल. डॉ. तात्याराव लहाने यांचे पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येत का हे पाहावं लागेल, अशी टीका करतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सज्जन गृहस्थ आहेत, निरागस आहेत. त्यांनी त्यांच्या पुढच्या निवडणुकीची तयारी करावी, असा टोला राऊत यांनी लगावला.

यावेळी त्यांनी गोव्याच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. गोव्यात काँग्रेसला सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न होते. गोव्याच्या वातावरणात कायम राजकारणाची नशा असते. ती अजून उतरलेली दिसत नाही. माझं आतापर्यंत काँग्रेस नेते वेणुगोपाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी बोलणं झालं. पण स्थानिक नेतृत्व जमिनीवर फक्त पाच बोटे चालत आहे, अशी टीका त्यांनी केली. तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांशी उद्या भेट होणार असून त्यात गोव्याच्या निवडणुकीवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

भाजपच्या आयुष्यात टीका करण्याशिवाय आहे काय? चीन आतमध्ये घुसत आहे. यावर भाजपनं बोलावं सीमेवर गंभीर परिस्थिती आहे, असं ते म्हणाले. तसेच कालच्या पंतप्रधानांच्या बैठकीला ज्यांच्याकडे सूत्र आहेत ते आरोग्यमंत्री उपस्थित होते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राकेश टिकेत लढाई संपवून घरी गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मी त्यांना भेटलो, असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र या भेटीतील चर्चेचा तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवरही भाष्य केलं. उत्तर प्रदेशात आम्ही ५० जागा लढणार आहोत, असं सांगत राऊत यांनी स्वबळाचा नाारा दिला.

एमएमआयचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खर्च द्यायचा की नाही ते आम्ही पाहू. तुम्ही महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्राच्या मातीचे खाता, मराठी मातीचा श्वास घेता, पण ही वक्तव्य म्हणजे बेइमानी आहे. शिवसेनेचा जन्म हा मराठी अस्मितेच्या प्रश्नावर झालाय, ही भाषा दक्षिणेत जाऊन करा. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी आम्ही तडजोड करणार नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

कोणाच्या बोलण्यावरून शिवसेना धोरण ठरवत नाही; राज ठाकरेंना टोला

राज्य मंत्रिमंडळात दुकानांच्या पाट्या मराठीत असाव्यात या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. परंतु मराठी पाट्यांसाठी मनसे अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहे. त्यामुळे मराठी पाट्यांचे श्रेय मनसेचं असल्याचेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. कोणाच्या बोलण्यावरुन शिवसेना आपली धोरणं ठरवत नाही. आमच्या पक्षातूनच अनेक जण मराठीचा विचार घेऊन बाहेर पडले आहेत. मराठी शिवसेनेचा आत्म आहे. त्यामुळे कोणी काय बोलल तर त्यावर शिवसेनेचे धोरण ठरत नाही असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी पाट्यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्याचे श्रेय मनसेला दिलं आहे. तसेच राज्य सरकारला आता त्या निर्णयावर ठाम राहण्याचा सल्ला दिला आहे. यावर संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला होता. राऊत म्हणाले की, कोणी काय सल्ला दिला आहे. यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्यावेळीपासून हे आंदोलन सुरु आहे. आमची स्थानीय लोकाधिकार समिती असेल ती अजूनही या प्रकारचे काम करत आहे.

अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले आहेत परंतु तोच विचार घेऊन ते गेले आहेत. कोणाला काय बोलतात किंवा बोलतील याच्यावर महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे धोरण ठरवत नाही. मराठी अस्मिता हा शिवसेनेचा आत्मा आहे. त्याच्याशी कधी आम्ही तडजोड करणार नाही असे संजय राऊत म्हणाले आहे.

माझी दृष्टी तपासण्यासाठी नेतृत्व समर्थ; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या चष्म्याचा नंबर तपासला पाहिजे असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. यावर माझी दृष्टी तपासण्यासाठी माझं नेतृत्व आणि संघ समर्थ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांनी महाराष्ट्रातील जनतेकडून माहिती घ्यावी की राज्यातील महाविकास सरकार उत्तम चाललं आहे का नाही? मुख्यमंत्री आजारी आहेत त्यामुळे त्यांच्या जागी कोणालातरी जबाबदारी द्यावी अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझी दृष्टी चेक करायला माझे नेतृत्व समर्थ आहे. ज्या संघापासून प्रेरणा घेऊन सामाजिक काम राजकीय काम करतो त्या संघाकडे तर उत्तम व्यवस्था आहे. आमचा कान पकडण्याची, आम्हाला दुरुस्त करण्याची व्यवस्था असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संजय राऊत नशीबाने लाईमलाईटमध्ये आले आहेत. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आले असा त्यांचा दावा आहे. त्यांनी माझी काही काळजी करु नये. महाराष्ट्र नीट चालला आहे की नाही याचा प्रामाणिक सर्व्हे १० हजार लोकांचा एखाद्या जिल्ह्यात घ्यावा मग त्यांना समजेल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. गेल्या ७० दिवसांपासून मुख्यमंत्री कोणाला भेटले नाही, शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही, नुकसान भरपाई मिळाली नाही, विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले नाही म्हणजे महाराष्ट्रात कारभार सुरळीत चालला असेल तर ठिक आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

एखादी दुर्घटना झाल्यावर तुम्ही व्हिसीद्वारे मार्गदर्शन करणार सांत्वन करणार, व्हिसीद्वारे सांत्वन करता येणार आहे का? त्यामुळे मी तुमच्या तब्येतीबाबत प्रार्थना करतो की लवकर बरे व्हावं, परंतु तोपर्यंत तुमच्या जागी कोणीतरी मुख्यमंत्री म्हणून लागेल त्यामुळे तो कोण असेल ते तुम्हीच ठरवा असे वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

राज्याच्या हितासाठी मात्र किती प्रश्न चाललंय, काल खाजगी क्लासचे शिक्षकांनी मागे लागून व्हिडीओ कॉल करायला लावले आहे. शिक्षकांचे मत आहे की, एका क्लासमध्ये ४० मुले चालत नाही तर एका कारखान्यात ४ हजार कर्मचारी उपस्थित असतात ते कसं चालेल. काहीतरी नियमावली तयार केली पाहिजे असे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध नाहीत. घरी बसून मार्गदर्शन करणं पुरक नाही असे असते तर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी असेच केले होते. मुख्यमंत्री म्हणजे उठणे, बसणे चालणे आणि समोरच्याला उत्साह देणे असे असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button