मंत्र्यांच्या राजीनाम्यामागे परफॉर्मन्स हाच निकष असेल तर नरेंद्र मोदींनाही हटवा !
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांचा टोला

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होत आहे. संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. मात्र कॅबिनेट विस्तारापूर्वी तब्बल ९ मंत्र्यांना आतापर्यंत राजीनामा देण्यात सांगितले आहे. कामगिरीच्या आधारावार मंत्र्यांना हटवणं आणि प्रमोशन देणं सुरू आहे. यावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. .
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, मंत्र्यांच्या राजीनाम्यामागे परफॉर्मन्स हाच निकष असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हटवलं पाहिजे. कॅबिनेट विस्तार म्हणजे डिफेक्टर एडजस्टमेंट एक्सरसाइज आहे. परफॉर्मन्सच्या आधारे पहिल्यांदा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हटवलं पाहिजे. कारण चीन आपल्या जमिनीवर कब्जा करून बसला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गृहमंत्रिपदावरून हटवलं पाहिजे कारण मॉब लिचिंग आणि कस्टोडियल डेथ प्रकरण गंभीर आहेत. नक्षलवाद नियंत्रणाबाहेर गेला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत धर्मेंद्र प्रधान यांनाही हटवलं पाहिजे कारण पेट्रोल-डिझेल दरवाढ नियंत्रणात ठेवण्यात ते अपयशी ठरले. अर्थव्यवस्थेच्या गैरनियोजनामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हटवायला हवं. इतकचं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही पदावरून हटवलं पाहिजे कारण त्यांनी देशातील शांती भंग केली आहे असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी लगावला आहे.