फोकस

आयएएस टॉपर टीना डाबी – अतहर आमिर कायदेशीररित्या विभक्त

जयपूर : सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल असलेल्या टीना डाबी आणि त्यांचा आयएएस पती अतहर आमिर यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला आहे. फॅमिली कोर्ट-१ ने त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. दोघांनी २० नोव्हेंबर २०२० रोजी परस्पर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास दोघे फॅमिली कोर्टात दाखल झाले. येथे दोघांनी पुन्हा एकदा विभक्त होण्याचा पुनरुच्चार केला. त्यानंतर कोर्टाने फर्मान जारी करण्याचे आदेश जारी केले.

टीना डाबी आणि अतहर आमिर हे दोघेही २०१६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. टीना डाबी सध्या वित्त विभागात संयुक्त सचिव आहेत. तर घटस्फोटाची याचिका दाखल झाल्यानंतर काही महिन्यांनी अतहर आमिर प्रतिनियुक्तीवर जम्मू-काश्मीला गेले. २०१५ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल असलेल्या टीना डाबी यांनी एप्रिल २०१८ मध्ये अतहर आमिर यांच्याशी लग्न केले.

काश्मीरच्या अतहर आमिर यांनीही २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षेत दुसरे स्थान मिळविले होते. टीना डाबी आणि अतहर आमिर हे दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत. प्रशिक्षणादरम्यान दोघे जवळ आले असल्याचे सांगितले जाते. त्यांचे लग्नही खूप चर्चेत होते. पंतप्रधान मोदींपासून ते त्यांच्या लग्नाला अनेक नामवंत लोक उपस्थित होते. काश्मीरमधील पहलगाममध्ये या दोघांचा विवाह झाला होता.

यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान पटकावल्यापासून टीना डाबी सतत माध्यमांच्या प्रकाशझोतात आहेत. तसेच, लग्नानंतर टीना डाबी यांनी आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर स्वत: ला काश्मिरी सून म्हणूनही ओळख करून दिली होती. मात्र, यानंतर टीना डाबी व अतहर आमिर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि दोघांनी परस्पर संमतीने जयपूरच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आता त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button