मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी भेटणार, पण आंदोलन चालूच राहणार : संभाजीराजे

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चानंतर राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं आहे. यावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देताना शुक्रवार, दि. १८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समन्वयकांसोबत भेटणार असल्याचं सांगितलं. मात्र, मुख्यमंत्र्यांना भेटणार असलो तरी आमचं आंदोलन सुरुच असणारी, अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजेंनी जाहीर केली.
राज्य सरकारने आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं असून ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाण्याकरिता आम्हाला काही मुद्द्यांचा अभ्यास करून जावं लागणार आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. त्यांना शुक्रवारी भेटू पण राज्य सरकारबरोबर आमच्या चर्चा होत असली तरी आंदोलनेही सुरूच राहणार आहेत, असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं.
सरकारने सकारात्मक पाऊल टाकलं आहे. आम्हीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. राज्य सरकारने चर्चेचं आमंत्रण दिलं असलं तरी नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडचे नियोजित आंदोलन होणारच आहे, असं सांगतानाच सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यास नाशिकचे आंदोलन विजयोत्सव म्हणून साजरा करू, असं संभाजीराजे यांनी जाहीर केलं.
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाजीराजेंना मुंबईत येऊन राज्य सरकारशी चर्चा करण्याचं आश्वासनच दिलं. राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचं कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालयातील वकिलांची टीम आपण बदलली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे, राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायची आहे, उद्याच तुम्ही मुंबईला यावं, उद्या मुख्यमंत्री, अजितदादा भेटतील. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, असं सतेज पाटील म्हणाले.