
मुंबई : फरक एवढाच आहे की मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. चाळीस वर्षानंतर सगळ पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो. पवारसाहेबही मोठे नेते आहेत ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले, पण ते सलग पाच वर्षे कधीच राहू शकले नाहीत. राहिले असते तर बरं झालं असतं, त्यांनी चांगलंच काम केलं असतं. पण त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी दोन वर्षे, कधी दीड वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहता आलं. मला एका गोष्टीचं यावेळी समाधान आहे की, मी विरोधी पक्षनेता म्हणून देखील समाधानी आहे हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ झालीय. हीच माझ्या कामाची पावती आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना उत्तर दिले आहे.
फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना ‘जनतेचं प्रेम पाहून मी अजुनही मुख्यमंत्री असल्याचं वाटतं’ असं वक्तव्य केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फडणवीसांच्या त्या वक्तव्यावरुन जोरदार टोला लगावला आहे. तर पवारांच्या या टोल्याला देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिलंय.
कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. मी ही चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मन की बात’ केलीय. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्विकारतो, असंही ते म्हणाले.
फडणवीसांनी जालियनवालाचा आदेशकर्ता दाखवला !
जालियनवालामध्ये गोळीबार करायला गव्हर्नर गेले नव्हते. पोलिसांनीच केला होता. पण आदेश गव्हर्नरचा होता. तसेच मावळमध्ये घडलं, असा पलटवार फडणवीस यांनी केला. शरद पवारांची पत्रकार परिषद कशावर होती हेच मला कळलं नाही. कारण ते वेगवेगळ्या विषयावर बोलले. मावळचा गोळीबार पोलिसांनी केला होता. जालियनवाला बागमध्ये गोळीबार करायला त्यावेळचे गव्हर्नर गेले नव्हते. तर पोलिसांनीच गोळीबार केला होता. त्यामागे गव्हर्नरचे आदेश होते. त्यामुळे मावळचा गोळीबारही जालियनवााल बाग सारखा होता. तिथे राज्यकर्त्यांना जायची गरज नव्हती, असं फडणवीस म्हणाले.
लखीमपूरमध्ये हिंसा होते आणि इकडे तुम्ही बंदच्या नावाखाली धुडगूस घालता. बंदमध्ये माल पळवून नेला जातो हे कोणतं राज्य आहे? शिवसेना बंदमध्ये सामिल असेल तर काय होतं हे पवारांनीच सांगितलं ही समाधानाची गोष्ट आहे. बंदचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे बंद किती शांततेत होता हे दिसून येतं. दुकानदारांचा माल आंदोलक घेऊन पळत होते. पोलीस बघत होते. हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद होता, अशी टीकाही त्यांनी केली.
अनिल देशमुखांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या आदेशाने झाली. उच्च न्यायालयाने सीबीआयची चोौकशीचे आदेश दिले. या सरकारने सीबीआयला प्रवेश बंदी केली होती. त्यामुळे बँकातील अनेक प्रकरणे धुळखात पडलेली आहेत. मात्र, देशमुख प्रकरणात उच्च न्यायालयानेच सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयावर पवारांचा विश्वास आहे की नाही?, असा सवाल त्यांनी केला.