Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : वर्ल्ड कपमध्ये प्रथमच भारताचा पाकिस्तानकडून लाजिरवाणा पराभव

बाबर आजम-मोहम्मद रिझवान या सलामीवीरांची नाबाद खेळी; भारत १० गड्यांनी पराभूत

दुबई : पाकिस्तानविरुद्धची ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारताची विजयाची मालिका आज खंडित झाली. पण, पाकिस्तानचा संघ इतक्या वाईट पद्धतीनं टीम इंडियाला पराभूत करेल, असे कुणाच्या ध्यानी मनीही नव्हते. शाहिन शाह आफ्रिदीनं दिलेल्या धक्क्यातून विराट कोहली व रिषभ पंतनं टीम इंडियाला सावरले. पण, खेळपट्टीचा रोख पाहता भारतीय गोलंदाजांना १५१ धावांचा बचाव करणे, सोपं नव्हते. मात्र, भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही ही खरी शोकांतिका ठरली. पाकिस्ताननं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर पहिला विजय मिळवला अन् तोही दणक्यात… १० गडी राखून पाकिस्तानने भारताला पराभूत केले.

शाहिन शाह आफ्रिदीनं सुरुवातीला धक्के दिल्यानतंरही टीम इंडियानं आजच्या सामन्यात पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ३१ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रिषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. रिषभ पुन्हा एकदा घाई करून माघारी परतला, पण त्यानं त्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली. चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूंत ५३ धावा जोडल्या आणि यात रिषभच्या ३९ धावा होत्या. विराट ४९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचून ५७ धावांवर झेलबाद झाला. भारतानं २० षटकांत ७ बाद १५१ धावा केल्या.

बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान ही फॉर्मात असलेली जोडी टीम इंडियावर भारी पडली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही त्यांची ४ शतकी भागीदारी ठरली आणि त्यांनी शिखर धवन/रोहित शर्मा व केन विलियम्सन व मार्टिन गुप्तील यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. बाबर व रिझवान ही जोडी सातत्यानं चांगली कामगिरी करत होती आणि त्यांना लवकर बाद करणे भारतीय गोलंदाजांना जमले नाही.

एकदा जम बसल्यावर मग पाकिस्तानच्या सलामीवीरांनी मागे वळून पाहिलेच नाही आणि भारतीय गोलंदाजांचा समाचार घेताना त्यांनी संघाला सहज विजय मिळवून दिला. विराट अँड कंपनी पाकिस्तानवर दबाव बनवण्यात सपशेल अपयशी ठरले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत एकाच सामन्यात दोन्ही सलामीरांनी अर्धशतक झळकावण्याची ही दुसरी वेळ ठरली. यापूर्वी डेव्हिड वॉर्नर/ शेन वॉटसन ( ब्रिजटाऊन, २०१० व कोलंबो २०१२) यांनी दोनवेळा असा पराक्रम केला. बाबर ५२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. रिझवान ५५ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावा केल्या. पाकिस्ताननं १७.५ षटकांत बिनबाद १५२ धावा केल्या.

पाकिस्तानला तुमचा अभिमान!; इम्रान खान यांच्याकडून कौतुक

पाकिस्ताननं वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच टीम इंडियावर विजय मिळवला. या विजयानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाला तुमचा अभिमान वाटतो, या शब्दात संघाचे कौतुक केले. ‘पाकिस्तान संघाचे आणि विशेषतः बाबर आजमचे अभिनंदन. रिझवान व शाहिन आफ्रिदी यांचेही कौतुक. देशाला तुमचा अभिमान!’ असे ट्विट इम्रान खान यांनी केलं.

ही सुरुवात आहे, शेवट नाही..; विराट कोहली

पाकिस्तानचा संघ आज सर्व आघाड्यांवर टीम इंडियावर भारी पडला. सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला की, आम्ही आखलेल्या रणनीतीची अंमलबजावणी करू शकलो नाही, परंतु पाकिस्तानला विजयाचे श्रेय द्यायला हवं. त्यांनी आज अप्रतिम खेळ केला. जेव्हा आघाडीचे तीन फलंदाज झटपट माघारी परतात, तेव्हा कमबॅक करणं खरंच अवघड असतं. विषेशतः जेव्हा मैदानावर दव फॅक्टर महत्त्वाचा असतो. पाकिस्ताननं गोलंदाजी आणि फलंदाजीत प्रोफेशनल खेळ केला. पहिल्या डावात चेंडूवर जोरदार फटका मारणं सोपं नव्हतं, ते पाकिस्तानच्या डावात सोपं झालं. त्यामुळे जेव्हा तुम्हाला माहीत असतं की परिस्थिती बदलणार आहे, तेव्हा १०-२० धावा अतिरिक्त करायला हव्या होत्या. या पराभवानं पॅनिक होऊ नका, ही सुरुवात आहे, शेवट नाही.

पहिल्याच सामन्यात बुकी मालामाल !

पारंपरिक शत्रू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट संघात सामना होणार असल्याने बुकींनी भारताला कल दिला होता. परंतु, सहा ओव्हरमध्येच बुकी बाजार गडबडला. कोट्यवधींची उलटफेर करणारे पंटर कंगाल अन् बुकी मालामाल झाले. भारताने अवघ्या ३ धावांवर रोहित शर्माची, नंतर केएल राहुल आणि त्यानंतर सूर्यकुमार अशा तीन विकेट गमविल्यामुळे बुकींना पाकिस्तानला फेवर केले. त्यामुळे पाकिस्तानच्या बाजूने ७६-७८ असा रेट गेला. नंतर मात्र ११ ओव्हरमध्ये ६६ धावा बनवून भारताने पुन्हा बुकींना आपल्याकडे आकर्षित केले. त्यामुळे भारतावर ८८-८९ असा दर दिला गेला. पहिली खेळी संपली तेव्हा १५१ धावांची पावती फाडून भारताने ७ विकेट गमावल्या होत्या. तोपर्यंत बुकीबाजारात ३०० कोटींपर्यंतच्या सट्ट्याची लगवाडी झाल्याचे सांगितले जात होते.

बुकींच्या मतानुसार विश्वचषकाच्या दावेदारीत भारत आणि इंग्लंड प्रमुख प्रतिस्पर्धी राहतील. कारण भारतानंतर सर्वाधिक सट्टा इंग्लंडवरच लागला आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला बुकींनी स्थान दिले आहे. सर्वात कमकुवत टीम म्हणून बुकींच्या नजरेत दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button