वाटलं होतं महसूल खातं मिळेल, पण ओबीसी असल्यानं कमी महत्वाचं खातं मिळालं : वडेट्टीवार
नागपूर : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा घणाघाती आरोप केलाय. त्यामुळे आघाडी सरकारला घरचा आहेर मिळाल्याची चर्चा आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, “महाराष्ट्रात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. ‘दुनिया झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये’. मला ओबीसीचं खातं भेटलं तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात. कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटलं चुकी झाली.
विरोधी पक्षनेता होतो. ओबीसीचं नेतृत्व करतो. मला वाटलं महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना. पंकजा मुंडे यांनाही ग्रामविकास खातं भेटलं होतं. निवडणुका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा. गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू
विजय वडेट्टीवार म्हणाले, मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. तुम्ही आम्ही एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे.
मला रोज धमक्या येतात, त्या टोकाच्या येतात. धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही आणि राहणारंही नाही. माझं काय होईल ते होईल, पण ओबीसींच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही. आपलं अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावं लागतं. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ. वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू. या आठवड्यात आयोगाला पत्रव्यवहार करु, त्यांना डाटा गोळा करायला हवं ते देऊ, असंही त्यांनी नमूद केलं.