देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील संघ मुख्यालयात; मोहन भागवत, भैय्याजी जोशी यांच्यासोबत गोपनीय चर्चा
नागपूर : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) नागपुरात दाखल झाले आहेत. विमानतळावरून उतरल्यानंतर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय गाठले. तेथे सरसंघचालक मोहन भागवत (mohan bhagwat) यांची भेट घेऊन तब्बल दीड तास चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे.
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत सरकार्यवाह भैय्याजी जोशी हेदखील मोहन भागवत यांच्यासोबत झालेल्या बैठकीला उपस्थित होते. बंद दाराआड झालेल्या या बैठकीबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात आली असून, नेमक्या कोणत्या मुद्यांवरून आणि कोणत्या कारणासाठी सदर बैठक झाली, याबाबत माहिती मिळालेली नाही.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे काहीच फलित झाले नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची निराशा झाली झाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. जनहिताचे मुद्दे उचलणे आमची जबाबदारी आहे, तशी वृत्तपत्रांचीही आहे. आम्ही विजेबद्दल, शेतकरी, कोविडबद्दल बोललो. पण त्यांना जनहिताचे मुद्दे दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे आणि बोचणारे मुद्दे दिसले. असा अग्रलेख आल्याने घाव वर्मी बसला आहे, हे लक्षात आले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी सामना अग्रलेखाबाबत बोलताना लगावला.