
मुंबई/पुणे : काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष काढल्यानंतरही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार कधीच सोडले नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यासाठी १९९९ पर्यंत वाट पाहिली, याची खंत नाही, असे ते म्हणाले. शरद पवार बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले, मी १९५८ साली पुण्यात आलो होतो. माझ्यासारख्या तरुणांना गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारसरणीची प्रेरणा मिळाली. त्यांचे विचार आम्ही स्वीकारले आणि त्यावर काम सुरू केले. काँग्रेस हा त्या विचारधारेचा मुख्य आधार होता, त्यामुळे त्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच केला नाही. काँग्रेसने मला पक्षातून बाहेर केले, त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा वेगळा निर्णय घ्यावा लागला, असेही पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही मत व्यक्त केल्याचे त्यांना पचनी पडले नाही, काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, पण गांधी, नेहरू, चव्हाण यांचे विचार आम्ही कधीच सोडले नाहीत. काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पवारांची मदत लागेल का? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, आज सर्व समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.
कितीही कष्ट करण्याची मोदींची तयारी असते; शरद पवारांकडून पंतप्रधानांचे कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे, असं म्हणत पवार यांनी मोदींचं कौतुक केलं.
कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे कौतुक केलं, तसंच मोदींनी एखादं काम हाती घेतलं तर ते काम पूर्ण करतातचं, असं पवार यावेळी म्हणाले. मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही देतात. एकदा का कोणतंही काम हाती घेतले की ते (काम) पूर्ण होईपर्यंत ते थांबणार नाही याची काळजी घेतात, असा मोदींचा स्वभाव आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
पंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे सहकारी कसे एकत्र येऊ शकतात यावर भर देतात. मित्रपक्षांना सोबत घेण्याची मोदींची पद्धत वेगळी आहे आणि ती शैली मनमोहन सिंग किंवा त्यापूर्वीच्या पंतप्रधानांमध्ये नसल्याचंही ते म्हणाले.
गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणतंही सुडाचं राजकारण केलं जाऊ नये, असं माझं आणि तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं मत होतं. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मी केंद्रात होतो. जेव्हा पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावत असतं तेव्हा मोदी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या गटाचं नेतृत्व करायचे आणि केंद्रावर हल्लाबोलही करत. अशा परिस्थितीत मोदींना कसं उत्तर द्यायचं याची रणनिती तयार केली जायची. युपीएमध्ये माझ्याशिवाय अन्य कोणताही मंत्री नव्हता जो मोदींशी चर्चा करू शकायचा. ते मनमोहन सिंग सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करायचे, असं म्हणत पवार यांनी एक किस्सा सांगितला.
भलेही मोदी आणि भाजप यांच्यासोबत मतभेद असतील, तरी ते मुख्यमंत्री आहेत हे विसरता कामा नये, असं आपण युपीएच्या अंतरिम बैठकीत सर्वांना सांगायचो. त्यांच्या पाठी जनादेश आहे हेदेखील विसरता कामा नये. जर ते याठिकाणी काही मुद्दे मांडत असतील तर, मतभेद दूर करत त्यांचं निराकरण व्हावं आणि त्यांच्या राज्यातील लोकांचं हित जपलं जावं हे आपलं कर्तव्य आहे. मनमोहन सिंग यांनीदेखील या मताच स्वागत केलं होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.