मुख्यमंत्र्यांकडे दिलगिरी, पण राऊतांसारख्या सोंगाड्यावर बोलणार नाही : प्रसाद लाड

मुंबई : खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांच्यावर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, आता प्रसाद लाड यांनी संजय राऊत यांच्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केली, पण संजय राऊत सारख्या सोंगाड्यावर बोलणं उचित वाटत नाही, असं म्हटलं आहे. ते रविवारी माध्यमांशी बोलत होते.
कालच्या वक्तव्यानंतर मी माझा एक व्हिडिओ सर्व प्रसारमाध्यमांना दिला होता. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आलं आहे. कैलासवासी शिवसेना प्रमुखांवर प्रेम करतो, आमचं दैवत समजतो, त्या शिवसेनाप्रमुखांबद्दल आणि त्यांच्या वास्तूबद्दल बोलल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली होती. माझ्यासाठी तो विषय संपलेला आहे, असं प्रसाद लाड म्हणाले. मात्र, पुढे त्यांना अरेला कारे करायची आमची तयारी आहे, असा इशारा देखील दिला आहे.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझा दिलगिरी व्यक्त केलेला व्हिडिओ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला आहे. राहिली गोष्ट संजय राऊत यांची…तर राऊतांसारख्या सोंगाड्यावर मला बोलायचं नाही, असं प्रसाद लाड म्हणाले.
नाहीतर राजकीय गांजाड्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही : राऊतांचा इशारा
वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. राज्यात नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणं गरजेचं आहे. नाहीतर राजकीय गांजाड्यांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फूटपाथवर बेदम चोपल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांचं नाव न घेता दिला आहे.
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर
बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)
शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे.
बाटगयांना हे कसे समजणार?— Sanjay Raut (@rautsanjay61) August 1, 2021
संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी प्रसाद लाड यांचं नाव न घेता थेट इशारा दिला आहे. “महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. (समझनेवालोंको इशारा काफी है.) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?” असं ट्विट संजय राऊत यांनी केला.




